जातेगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या
By admin | Published: May 18, 2017 12:26 AM2017-05-18T00:26:45+5:302017-05-18T00:26:58+5:30
जातेगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदगाव : कर्ज फेडणे अशक्य झाल्याने नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील शेतकरी तुकाराम रंगनाथ सोनवणे (४९) यांनी आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली.
या शेतकऱ्यावर विविध कार्यकारी सोसायटी, बँकेचे १२ लाखांचे कर्ज होते. ते फेडण्याच्या विवंचनेतून त्यांनी १६ मे रोजी सायंकाळी सातच्या सुमारास विहिरीवरील विद्युत मोटारच्या चालू वीज प्रवाहाची वायर हातात घेऊन आत्महत्या केली. ही घटना घडल्यानंतर गोठ्यात बांधलेले वासरू जोरजोरात हंबरू लागल्यानंतर घरातील कुटूंबीयांच्या सदर प्रकार लक्षात आला. त्यांनी मदतीसाठी तातडीने परिसरातील नागरिकांना बोलावले. मात्र सोनवणे यांचा तत्पुर्वीच मृत्यू झाला होता. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, मुली, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर बुधवारी सकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. नांदगाव तालुक्यात शेतकरी आत्महत्येची ही चौथी घटना आहे.