शेततळे-वनतळ्यांची तपासणी
By admin | Published: June 12, 2015 11:25 PM2015-06-12T23:25:00+5:302015-06-12T23:56:22+5:30
हरिश्चंद्र चव्हाण यांचे आदेश : दुबार घरकुलांच्या लाभाचीही चौकशी
नाशिक : स्थानिक स्तर विभागामार्फत बांधण्यात आलेल्या शेततळे व वनतळ्यांची विशेष भरारी पथकामार्फत अचानक तपासणी करण्याचे आदेश जिल्हा दक्षता नियंत्रण समितीचे अध्यक्ष खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी प्रशासनाला दिले, तसेच दुबार घरकुल योजनेचा लाभ घेणाऱ्या तक्रारींची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याचेही आदेश दिले.
श्ुक्रवारी (दि. १२) जिल्हा दक्षता नियंत्रण समितीची बैठक झाली. बैठकीच्या सुरुवातीलाच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एकनाथ माले यांची खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी खरडपट्टी काढली. लोकप्रतिनिधींचे फोन कमीत कमी घेत जा. तोंडावर सिंहस्थ येऊन ठेपलाय. काही गंभीर प्रसंग ओढवला तरी तुम्ही मी बैठकीत आहे असे उत्तर देता कामा नये, या शब्दांत डॉ. माले यांची खासदार चव्हाण यांनी खरडपट्टी काढली. वन विभागाबाबत आढाव्यात अधिकारीच नसल्याने काय आढावा घ्यायचा, प्रतिनिधी म्हणून जे अधिकारी येतात त्यांनाही काही माहिती नसते त्यांनी बैठकांना तरी का यावे, असे खासदार चव्हाण यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले. खासदार सुभाष भामरे यांनी बैठक चार-चार तास सुरू असल्याने दोन टप्प्यात ही बैठक घेण्यात यावी. तीन महिन्यांत एक बैठक घेण्यापेक्षा दीड महिन्यातून बैठक घ्यावी, अशा सूचना केल्या. तसेच गैरहजर अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
आमदार डॉ. राहुल अहेर यांनी सांगितले की, वनतळे मंजूर होतात, परंतु ते झालेले नाही. पूर्व व पश्चिम विभागाकडील मंजूर वनतळ्यांची यादी द्या, अशी मागणी केली. यावेळी जि. प. अध्यक्ष विजयश्री चुंबळे, आमदार दीपिका चव्हाण, पंचायत समिती सभापती मंदाकिनी निकम, जयंत वाघ, सुभाष कराड, अनिता जाधव, कमल सोनवणे, धर्मराज पवार, कमल सोनवणे यांच्यासह अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा संचालक अरविंद मोरे, साहेबराव पाटील, ललित चव्हाण आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)