शेतकऱ्याला केली दुकानदाराने मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 12:55 AM2021-06-18T00:55:54+5:302021-06-18T00:56:53+5:30
विद्युत पंपाचे नवीन स्टार्टर सुरू करताच शॉर्टसर्किट होऊन तरुण शेतकऱ्याचा हात भाजला. याविषयी तक्रार करणाऱ्या ग्राहकाला दुकानदाराने बेदम मारहाण केल्याचा प्रकार सटाणा येथे मंगळवारी (दि.१६) घडला.
सटाणा : विद्युत पंपाचे नवीन स्टार्टर सुरू करताच शॉर्टसर्किट होऊन तरुण शेतकऱ्याचा हात भाजला. याविषयी तक्रार करणाऱ्या ग्राहकाला दुकानदाराने बेदम मारहाण केल्याचा प्रकार सटाणा येथे मंगळवारी (दि.१६) घडला.
तरुणाच्या कपाळाला टाके पडले असून, उजव्या डोळ्याला गंभीर इजा झाली आहे. याप्रकरणी कठोर कारवाईसाठी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खाडवी यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.
भाक्षी येथील शेतकरी सुनील रौंदळ यांनी स्टेट बँकेच्या सटाणा शाखेसमोरील एका इलेक्ट्रॉनिक दुकानातील ब्रँडेड कंपनीचे स्टार्टर मंगळवारी खरेदी केले. कारागिराकडून त्याची विहिरीवर जोडणी केली. ते सुरू करताच शॉर्टसर्किट होऊन रौंदळच्या हाताची बोटे भाजली. या प्रकाराविषयी त्यांनी दुकानदाराकडे मंगळवारी तक्रार केली. दुकानदाराने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने शाब्दीक खटके उडून दुकानदाराच्या मुलाने थेट नादुरुस्त स्टार्टर शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर मारले. कपाळावर खोलवर जखम होऊन ओठही फाटले. अशाही अवस्थेत दुकानदार व कर्मचाऱ्याने शेतकऱ्याला बेदम मारहाण केल्याने तो रक्तबंबाळ झाला. जखमी शेतकऱ्याने सटाणा पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्याचे वैद्यकीय प्रमाणपत्रही सादर झाले; परंतु मारहाण करणाऱ्यावर राजकीय दबावातून कारवाई टाळण्याचे प्रयत्न झाल्याने शेतकऱ्याने बुधवारी (दि.१७) अपर पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार दाखल करून संबंधितावर कारवाईची मागणी केली आहे.