नाशकात शेतकरी कामगार पक्षाचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 06:52 PM2017-12-05T18:52:58+5:302017-12-05T18:57:13+5:30
नाशिक : सत्तेवर आलेल्या केंद्र व राज्य सरकारने दिलेली आश्वासने न पाळल्याच्या निषेधार्थ मंगळवारी भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशी धरणे आंदोलन करून मागण्यांचे निवेदन जिल्हाधिका-यांना देण्यात आले.
केंद्रात व राज्यात भाजपाचे संयुक्त सरकार सत्तेवर येताना दिलेली आश्वासने व सत्तेत आल्यानंतर केलेल्या घोषणा फसव्या असल्याचे लक्षात आल्याने शेतकरी, कष्टकरी व कामगार, व्यावसायिक यांचा भ्रमनिराश झाला असून, सरकारच्या जनहित विरोधी भुमिकेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. तो व्यक्त करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाने आंदोलन केले. यावेळी शेतीमालाला किफायतशीर भाव द्यावा, शेतक-यांना कर्जमुक्त करा, नव्याने त्वरीत कर्ज पुरवठा करण्यात यावा, अवास्तव वीज बिले रदद करा, वीज पुरवठा नियमीत करा, वाढती महागाई कमी करा, पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दरवाढ नियंत्रीत करा, भ्रष्टाचार कमी करा, दोषी अधिका-यांवर कारवाई करा, बेरोजगारांना काम द्या, वन जमिनींच्या दाव्यांचा त्वरीत निकाल देऊन कसत असणाºया आदिवासींच्या नावे सात बारा करण्यात यावा आदी मागण्याही करण्यात आल्या आहेत. यावेळी जिल्हाधिका-यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी जिल्हा चिटणीस अॅड. मनिष बस्ते, अशोक बोराडे, पी. बी. गायधनी, केरू पाटील हगवणे, संदीप पागेरे, निवृत्ती पाटील गायधनी, कचरू पाटील, सुकदेव गायखे, केशवराव लोहट, कचरू हांडगे, अशोक वाजे, परमेश्वर नाठे, देवराम पाटील आदी उपस्थित होते.