शेतकरी आंदोलनाचा नाशिक जिल्ह्याला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:24 AM2020-12-03T04:24:44+5:302020-12-03T04:24:44+5:30

नाशिक : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी दिल्ली आणि पंजाब येथे सुरू असलेल्या आंदोलनाचा फटका नाशिक ...

Farmers' agitation hits Nashik district | शेतकरी आंदोलनाचा नाशिक जिल्ह्याला फटका

शेतकरी आंदोलनाचा नाशिक जिल्ह्याला फटका

Next

नाशिक : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी दिल्ली आणि पंजाब येथे सुरू असलेल्या आंदोलनाचा फटका नाशिक जिल्ह्याला बसत आहे. पंजाबमधून येणारा गहू आणि तांदुळ अडकून पडल्याने रेशनवरील धान्य वितरण व्यवस्था कोलमडून पडली असून, जिल्ह्यातील अनेक ठिकाणी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यातील धान्य पुरवठा हेाऊ शकला नाही. जवळपास ३० ते ४० टक्के रेशनदुकानांमध्ये पुरेसे धान्य पोहचू शकलेले नसल्याने हजारो रेशनकार्डधारक धान्यापासून वंचित आहेत.

नव्या शेतकरी कायद्याच्या विरोधात दिल्लीत सुरू असलेेल्या आंदोलनाने उग्र स्वरूप घेतले असून, आंदोलन पेटण्याची शक्यता आहे. या आंदोलनासाठी हरयाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेश या राज्यातील शेतकऱ्यांचा मोठा सहभाग आहे. दिल्लीत धडक देण्यापूर्वी या राज्यांमध्ये आंदोलन अगोदरच पेटले होते. पंजाबमध्ये शेतकऱ्यांनी गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन तीव्र केले आहे. अनेकदिवस रेल्वे गाड्या रोखून धरल्याने त्याचा परिणाम रेल्वेतून वाहतूक होणाऱ्या धान्यावरही झाला आहे. नाशिक जिल्ह्यासाठी पंजाबमधून धान्याच्या वॅगन्स येतात. परंतु गेल्या दोन महिन्यांत तेथील आंदोलनामुळे धान्य पुरवठा विस्कळीत झालेला आहे.

गेल्या ऑक्टोबर महिन्याचे धान्य कसेबसे प्राप्त झाले असले तरी जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्येच वाटप होऊ शकले, तर नोव्हेंबरचे धान्यदेखील पूर्ण क्षमतेने मिळालेले नाही. ऑक्टोरबचे धान्य नोव्हेंबरमध्ये काही प्रमाणात मिळाले तर नोव्हेंबरचे धान्य मिळण्याबाबतची साशंकता निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रसंगी धान्य वाटपाला मुदतवाढदेखील देण्याची वेळ पुरवठा विभागावर येऊ शकते. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्यांचे धान्य वाटप विस्कळीत झाले आहे. नेाव्हेंबरअखेरपर्यंत ऑक्टोबर महिन्यातील धान्य वाटपाची प्रक्रिया सुरू होती. अजूनही ३० ते ४० टक्के धान्य वाटप करणे बाकी आहे.

--इन्फो--

सहा तालुक्यांना प्रतीक्षा

धान्य पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे सिन्नर, नाशिक शहर, नाशिक तालुका, इगतपुरी, दिंडेारी, पेठ आणि सुरगाणा या तालुक्यांना अजूनही धान्य वितरणाची प्रतीक्षा आहे. येथील वितरणव्यवस्था ठप्प झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील काही भागांत धान्य, तर काही ठिकाणी प्रतीक्षा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

--इन्फो--

मुदतवाढीची शक्यता

दिल्लीत आंदोलक शेतकरी तळ ठोकून असल्याने आंदोलन अधिक लांबले तर नाशिक जिल्ह्याला अधिक फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे धान्य वितरणासाठी रेशनदुकानदारांना काही दिवसांची मुदतवाढदेखील मिळण्याची शक्यता आहे.

Web Title: Farmers' agitation hits Nashik district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.