लेखी आश्वासनानंतर शेतकरी संघटनेचे आंदोलन स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 12:38 AM2020-12-05T00:38:15+5:302020-12-05T00:38:38+5:30
महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकर्यांची होणारी लूट थांबवावी, या मागणीसाठी शेतकरी सघटनेने मागील दोन दिवसांपासून सुरू केलेले धरणे आंदोलन पणन सहसंचालक विनायक कोकरे यांनी ठोस कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर सायंकाळी स्थगित करण्यात आले. या आंदोलनात नाशिकच्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नाेंदविला.
नाशिक : महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकर्यांची होणारी लूट थांबवावी, या मागणीसाठी शेतकरी सघटनेने मागील दोन दिवसांपासून सुरू केलेले धरणे आंदोलन पणन सहसंचालक विनायक कोकरे यांनी ठोस कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर सायंकाळी स्थगित करण्यात आले. या आंदोलनात नाशिकच्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नाेंदविला.
राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कडता, पोटली, पायली, अवाजवी हमाली, छुपी अडत वसुली, बोगस पावत्या, रोख पैसे दिल्यास बटावा रक्कम कापणे असे अनेक गैरप्रकार सर्रास सुरू आहेत. प्रशासनाकडे तक्रार करूनही काही उपयोग नसल्यामुळे शेतकरी संघटनेने धरणे आंदोलन केले होते. शुक्रवारी पणन सहसंचालक कोकरे यांनी जिल्हावार सर्व जिल्हा उपनिबंधक व बाजार समित्यांना दोषी आडते व कर्मचार्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. एक महिन्यात सर्व बाजार समित्यांतील सर्व गैरव्यवहार बंद करण्याचे आश्वासन शेतकरी संघटनेला देण्यात आले. दिलेले अश्वासन मान्य करून सांयकाळी धरणे आंदोलन मागे घेण्यात आले.
आंदोलनात नाशिक, पुणे, अकोला, लातूर, हिंगोली, परभणी, नगर या जिल्ह्यांतील कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनाच्या समारोपप्रसंगी ललित बहाळे, सीमा नरोडे, शंकरराव ढिकले. अर्जुनतात्या बोराडे. शकंर पूरकर, रामनाथ ढिकले आदी नेत्यांची भाषणे झाली. आंदोलनास, स्वतंत्र भारत पक्ष, स्वर्ण भारत पार्टी व रयत क्रांती संघटना, शंभू सेनेने पाठिंबा दिला होता.