भाजीपाला रस्त्यावर फेकून शेतक-यांनी व्यक्त केला संताप, मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2018 09:37 AM2018-03-17T09:37:30+5:302018-03-17T10:54:00+5:30
शेतपिकाला हमीभाव मिळत नसल्यानं संतप्त शेतक-यांनी रास्तारोको आंदोलन सुरू केले आहे.
नाशिक - घोटीतील कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना कोणत्याही पूर्वसूचना न देता भाजीपाला विक्री केंद्र स्थलांतरित केला. याला तीव्र विरोध दर्शवण्यासाठी शेतकऱ्यांनी मुंबई-आग्रा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. तसेच सर्वच भाजीपाल्याला मिळणाऱ्या कमी भावाचा निषेध केला. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला शेतीमाल रस्त्यावर ओतून बाजार समितीवरील आपला रोष व्यक्त केला.
दरम्यान, यावेळी बाजार समितीचा एकही पदाधिकारी अथवा सचिव हजर न झाल्याने शेतकऱ्यांनी बराच वेळ महामार्गावर ठिय्या मांडला. घोटी बाजार समितीने शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना कोणत्याही पूर्वसूचना न देता आज अचानक भाजीपाला विक्री केंद्र शहराबाहेर स्थलांतरित केल्याने तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाला. स्थलांतरीत केलेल्या जागेत कोणत्याही सोयीसुविधा न देता बाजार स्थलांतरित करण्याचा एकतर्फी निर्णय बाजार समितीने घेतल्याने या निर्णयाच्या निषेधार्थ शनिवारी (16 मार्च) सकाळी 8 वाजता सर्व शेतक-यांनी संघटीत होत शेतकरी नेते पांडुरंग शिंदे यांच्या नेतृत्वात रस्त्यावर उतरले.
मुंबई-आग्रा महामार्गावर या शेतकऱ्यांनी ठिय्या मांडून महामार्ग रोखून धरला. बाजार समितीवर भाजीपाला विक्री केंद्र आहे त्याच ठिकाणी ठेऊन शेतकऱ्यांना मुलभूत सुविधा द्याव्यात. शेतीमालाला हमीभाव मिळावा अशा मागण्या करत शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला शेतीमाल रस्त्यावर ओतून दिला. दरम्यान या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक बराच वेळापासून ठप्प झाली असून वाहनाच्या दुतर्फा रांगा लागल्या आहेत.