शेतकरी आत्महत्त्या रोखण्यासाठी कटिबद्ध
By admin | Published: December 26, 2015 09:57 PM2015-12-26T21:57:17+5:302015-12-26T22:16:07+5:30
पंकजा मुंडे : प्रभाग १७ मध्ये विकासकामांचे उद्घाटन
सातपूर : राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या रोखण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. आत्महत्त्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना शेतीसाठी पुरेसे पाणी मिळावे म्हणून राज्य सरकारच्या वतीने जलयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.
विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी सातपूर येथील प्रभाग क्रमांक १७ मध्ये आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. मराठवाड्याच्या तुलनेत नाशिकला पाणी मुबलक आहे. येथील रस्ते आणि विकासाची कामे चांगली असल्याचे मंत्री मुंडे यांनी सांगितले. यावेळी कामगारमंत्री प्रकाश मेहता यांनी जंगलीदास महाराज यांच्या नामकरण सोहळ्यावरून अध्यात्माचे महत्त्व विशद केले. तर महापौर अशोक मुर्तडक यांनी कुंभमेळ्यात महापालिकेचा खूप निधी खर्च झाला आहे, त्यामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती खालावली असून, निधीअभावी विकासकामे रखडली आहेत. राज्य शासनाने मंजूर केलेले पैसे मिळण्यासाठी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि कामगार मंत्री प्रकाश मेहता यांनी प्रयत्न करावेत, अशी आग्रही मागणी यावेळी केली. यावेळी नगरसेवक दिनकर पाटील यांनी पालिकेच्या माध्यमातून प्रभागात राबविलेल्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच स्मार्ट प्रभागासाठी मी कटिबद्ध असेल, असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले.
यावेळी व्यासपीठावर आमदार बाळासाहेब सानप, आमदार देवयानी फरांदे, उपमहापौर गुरुमित बग्गा, सभागृहनेते सलीम शेख, प्रभाग सभापती उषा शेळके, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, कामगार उपआयुक्त आर. एस. जाधव, तसेच भाजपा शहर अध्यक्ष लक्ष्मण सावजी, सुनील बागुल आदिंसह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. नगरसेवक लता पाटील व अमोल पाटील यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. (वार्ताहर)