शेतकरी दुहेरी संकटात

By admin | Published: September 20, 2015 10:17 PM2015-09-20T22:17:16+5:302015-09-20T22:18:15+5:30

संततधार : देशमानेत शेततळे गेले वाहून; जायखेड्यात घराची भिंत कोसळली

Farmers are in double trouble | शेतकरी दुहेरी संकटात

शेतकरी दुहेरी संकटात

Next

देशमाने : गेल्या दोन दिवसांत झालेल्या उत्तरा नक्षत्राच्या पावसाने शेतकरीवर्गात समाधानाचे वातावरण असले तरी काही शेतकऱ्यांवर नुकसानीने दुहेरी संकट ओढवले आहे. शुक्रवारी झालेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे घरांचे पत्रे उडून गेल्याने काही शेतकऱ्यांचा संसार उघड्यावर आला आहे.
परिसरात साडेतीन महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर झालेला जोरदार पावसाने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान केले. देशमाने (बु) येथील यशवंत जगताप यांच्या शेतातील शेततळे वाहून गेले. सुरेश दुघड यांची विहीर जमीनदोस्त झाली. सुनील विठ्ठल शेळके यांचे चार एकर कांद्याचे मोठे नुकसान झाले. गोरख शिंदे व परिसरातील शेतकऱ्यांनी लोकवर्गणीतून बांधलेला रस्ता पावसामुळे वाहून गेला. मानोरी (बु) येथील शिवाजी नारायण शेळके यांच्या घरात पुराचे पाणी घुसल्याने मोठे नुकसान झाले. गोई नदीवरील देशमाने गावनजीक शिवकालीन, संपूर्ण ग्रामीण योजनेंतर्गत साठवण बंधाऱ्याचे भरावे खचले.
जायखेडा : जायखेडा व परिसरासह संपूर्ण मोसम खोऱ्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. काही महिन्यांपासून दुष्काळाच्या तीव्र झळा या भागातील शेतकऱ्यांना सोसाव्या लागत होत्या. पावसाअभावी शेती व्यवसाय पूर्ण अडचणीत आल्याने शेतकरी वर्ग पुरता हवालदिल झाला होता. पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईचा सामना या भागातील नागरिकांना करावा लागत होता. सुदैवाने गुरुवारी गणेश चतुर्थीच्या मध्यरात्रीपासून परतीच्या पावसाने जोरदार आगमन केल्याने शेतकरी सुखावला आहे.
शनिवार व रविवारी कमीअधिक प्रमाणात पावसाची रिपरिप सुरुच होती. परतीच्या पावसाने पिकं हाती येणार नसली तरी जनावरांच्या चाऱ्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. रब्बीपिकांसाठी हा पाऊस लाभदायक ठरला आहे. गेल्या दोन दिवसांतील मुसळधार पावसाने एकीकडे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी अनेक जणांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात शेतपिकांबरोबरच अनेक घरांची पडझड झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. जायखेडा येथील हनुमान चौकात राहणाऱ्या अनुसयाबाई पोपटराव खैरनार यांचे राहत्या घराचे छत कोसळल्याने मोठे नुकसान झाले. सुदैवाने त्यांच्या कुंटुबीयांनी जोरदार पावसाचा अंदाज घेऊन दुसरीकडे आश्रय घेतल्याने मोठा अनर्थ टळला. न्यु प्लॉट येथे राहणारे अपंग गृहस्थ साईनाथ नहिरे यांचे राहत्या घराची भिंत कोसळली. यावेळी नहिरे हे भितींला टेकून बसलेले होते, मात्र भिंत विरूद्ध दिशेला पडल्याने जीवितहानी टळली. त्याचबरोबर जायखेडा व परिसरातील अनेक घरांची कमीअधिक प्रमाणात पडझड झाली आहे.नदीकाठावरील व परिसरातील सर्वच गावांमध्ये काही महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. अनेक वर्षांच्या इतिहासात प्रथमच एक दिवसाआड एकच वेळ पिण्याचे पाणी उपलब्ध होत होते. शुक्रवारच्या पावसाने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. हरणबारी धरण ओव्हरफ्लो होऊन पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (लोकमत चमू)

Web Title: Farmers are in double trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.