अळी निर्मूलन होत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 06:24 PM2019-07-19T18:24:20+5:302019-07-19T18:24:34+5:30
पाटोदा : येवला तालुक्यातील पाटोदा,ठाणगाव ,कानडी,आडगाव रेपाळ, पिंपरी,पिंपळगाव लेप,शिरसगाव लौकी ,वळदगाव,विखरणी ,कातरणी, विसापूर व परिसरात गेल्या काही वर्षांपासून खरीप हंगामातील मका पिकाच्या लागवड क्षेत्रात वाढ होत आहे. मात्र या वर्षी मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने या अळीच्या निर्मुलनासाठी शेतकरी रोज महागडी औषधे फवारणी करीत आहेत. उपाययोजना करुनही अळी काही केल्या कमी होत नसल्याने शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे.
येवला तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून दुष्काळ कमी होण्या ऐवजी वाढतच चालल्याने शेती व्यवसाय धोक्यात आला आहे.पावसाळ्याचे दोन मिहने संपत आले तरी तालुक्यात कुठेही समाधानकारक पाऊस पडलेला नाही .तालुक्यातील शेतकर्यांनी उशिरा आलेल्या पावसाच्या ओलीवर खरीप हंगामातील पिकांची लागवड केली आहे. त्यात पिके उतरून पडली मात्र गेल्या वीस बावीस दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी हवाल दिल झाला आहे.येवला तालुका कृषी विभागाच्या वतीनेही गावं, परिसरात अमेरिकन लष्करी अळीचा सामना करण्यासाठी शेतकरी वर्गाला मार्गदर्शन करीत आहे. मकाच्या प्रत्येक झाडामध्ये लष्करी अळी व अंडी मोठ्या प्रमाणात असून शेतकरी वर्ग सकाळ, संध्याकाळ या पिकावर महागडी औषधे फवारणी करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.