शेतकरी खेळत आहेत टोमॅटो लागवडीचा जुगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:14 AM2021-05-26T04:14:19+5:302021-05-26T04:14:19+5:30
येवला/जळगाव नेऊर : येवला तालुक्यात टोमॅटोची लागवडीची लगबग सुरू झाली असून, सरी पाडणे, ठिबक पसरविणे, मल्चिंग पेपर अंथरणे, रासायनिक ...
येवला/जळगाव नेऊर : येवला तालुक्यात टोमॅटोची लागवडीची लगबग सुरू झाली असून, सरी पाडणे, ठिबक पसरविणे, मल्चिंग पेपर अंथरणे, रासायनिक खते, शेणखत मिक्स करणे ही कामे सुरू झाली असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यापारी येतील का, बाजारसमित्या चालू राहतील का? मजूर मिळतील का, हे भविष्य अंधारमय असताना, शेतकरी मात्र टोमॅटो लागवडीतून आपला जुगार खेळू पाहात आहेत.
मागील वर्षी कोरोना संसर्ग साथीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी टोमॅटो लागवडीकडे पाठ फिरविली. पर्यायाने कोरोनाला न घाबरता, ज्या शेतकऱ्यांनी टोमॅटो लागवड केली, त्या शेतकऱ्यांच्या पदरात चार पैसे पडले. त्यामुळे या वर्षीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात शेतकरी टोमॅटो लागवडीच्या जोरदार तयारीला लागला असून, शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात टोमॅटो रोपांचे बुकिंग केले आहे.
-----------------
टोमॅटोचे क्षेत्र वाढले
मागील वर्षी शेतकऱ्यांना टॉमेटोतून बऱ्यापैकी पैसे झाल्याने मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी टोमॅटो बुकिंग केल्याने, यावर्षी टोमॅटो क्षेत्र लागवड वाढणार आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी पंधरा दिवस अगोदर टोमॅटो लागवड होत असून, लागवडीसाठी वातावरण पोषक तयार होत आहे.
--------------------
लागवडीचा खर्च वाढला
मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी टोमॅटो लागवडीचा खर्च वाढला असून, मल्चिंग पेपर, तार, बांबू, मशागत या खर्चात वाढ झाली असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांना टोमॅटो पीक उभं करण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असल्याने, शेतकरी आपला शेतीमाल विकून टोमॅटोचे पीक उभे करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. गेल्या एक-दीड महिन्यांपासून कोरोना संसर्ग साथीच्या रोगामुळे मजूर वर्ग कामावर येण्यासाठी घाबरत असून, बऱ्याच प्रमाणात शेतकरी घरीच कामे करत आहेत. त्यामुळे पुढे येणाऱ्या टोमॅटोच्या हंगामासाठी मजुरांची टंचाई भासणार आहे.
...अन्य पिकांना फाटा
टोमॅटो लागवडीसाठी अनेक शेतकऱ्यांनी इतर पिकांना फाटा देऊन टोमॅटो लागवडीसाठी विहीर, शेततळ्यात पाणी साठवून ठेवलेले आहे.
-----------------------
लाॅकडाऊन असल्यामुळे मल्चिंग पेपरचे दर दरवर्षीच्या तुलनेत वाढलेले आहे. रोपे, खतांच्या बाबतीत तोच प्रश्न आहे. डिझेल महाग झाल्याने शेतीसाठी मशागतीचा खर्च वाढला आहे, भाजीपाला पिकाला भाव सापडेल की नाही, याची खात्री नाही, अशाही परिस्थितीत बळीराजा आपले नशीब आजमाविण्यासाठी तयारीला लागला आहे.
- बाळासाहेब गुंड, टोमॅटो उत्पादक जळगाव नेऊर
---------------
टोमॅटो लागवडीसाठी ट्रॅक्टरच्या साह्याने मल्चिंग पेपर अंथरताना शेतकरी. (२५ जळगाव नेऊर)
===Photopath===
250521\25nsk_23_25052021_13.jpg
===Caption===
२५ जळगाव नेऊर