पावसाच्या हजेरीने शेतकरी समाधानी

By admin | Published: September 16, 2016 11:41 PM2016-09-16T23:41:01+5:302016-09-16T23:41:16+5:30

सिन्नरला झोडपले : अजून प्रतीक्षा कायम

Farmers are satisfied with the muster rain | पावसाच्या हजेरीने शेतकरी समाधानी

पावसाच्या हजेरीने शेतकरी समाधानी

Next

नाशिक : दीड महिन्यापासून दडी मारून बसलेल्या पावसाने अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर दुपारनंतर संपूर्ण जिल्ह्यात हजेरी लावल्यामुळे शेतकरीवर्ग आनंदित झाला असून, सिन्नर तालुक्याला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. शुक्रवारी दिवसभर हवेत उष्मा व ढगाळ वातावरण असल्याने सूर्यदर्शन होऊ शकले नाही.
आॅगस्टच्या प्रारंभी जोरदार झोडपून काढणाऱ्या पावसाने त्यानंतर मात्र पाठ फिरविली. याच पावसामुळे जिल्ह्यातील धरणांच्या साठ्यात कमालीची वाढ झाली. नद्या, नाल्या दुथडी भरून वाहिल्या, तर पेरणीयोग्य परिस्थिती निर्माण होऊन सुमारे ९० टक्के पेरण्या पार पडल्या. त्यानंतर मात्र पाऊस गायब झाला.
महिना उलटल्यानंतर पिकांना दुसऱ्या पाण्याची गरज भासू लागलेली असताना उन्हाचा तडाखाही वाढला. शेतातील उभी पिके पाण्याअभावी जळण्याची परिस्थिती निर्माण होऊन पावसाची गरज व्यक्त केली जात असताना, गुरुवारी दुपारनंतर पावसाने जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावली. त्यामुळे मका, भात, नागली या पिकांना जीवदान मिळण्यास मदत झाली आहे.
सध्या मका पिकात दाणा भरण्याची वेळ असल्याने अशावेळी पाण्याची नितांत गरज आहे, तर भात व नागलीलादेखील सलग पाण्याची गरज आहे. अशा ऐन गरजेच्या वेळी पावसाची हजेरी दिलासादायक असून, अजून काही दिवस पाऊस पडला तरी तो पिकांना हवाच आहे, अशी माहिती कृषी सूत्रांनी दिली. येत्या पंधरा ते वीस दिवसांत पाऊस झाला तर शेती उत्पादनात वाढ होईल. पण पावसाने दडी मारल्यास जवळपास २० टक्क्याने उत्पादनात घट होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
गुरुवारी सर्वाधिक पाऊस सिन्नर तालुक्यात ७४ मिलिमीटर इतका नोंदविण्यात आला आहे. त्या खालोखाल देवळा ६३, येवला ५४ मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला आहे.
जिल्ह्यात नाशिक ४.६, इगतपुरी १७, दिंडोरी २, पेठ १०.२, त्र्यंबकेश्वर ३, मालेगाव १६, नांदगाव ३९, चांदवड १४, कळवण १०, बागलाण २८, सुरगाणा १९, निफाड ३८.८ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

Web Title: Farmers are satisfied with the muster rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.