सटाणा तहसीलदारांसमोर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न
By admin | Published: May 23, 2017 02:09 AM2017-05-23T02:09:30+5:302017-05-23T02:09:44+5:30
सटाणा : गारपिटीमध्ये झालेल्या नुकसानाची भरपाई न मिळाल्याने तालुक्यातील द्याने येथील शेतकऱ्याने सोमवारी तहसीलदारांच्या दालनात स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सटाणा : गारपिटीमध्ये झालेल्या नुकसानाची भरपाई न मिळाल्याने तालुक्यातील द्याने येथील शेतकऱ्याने सोमवारी तहसीलदारांच्या दालनात स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शेतकरी शैलेश जिभाऊ कापडणीस (४५) याला अटक केली आहे. तीन आठवड्यांपूर्वी बागलाण तालुक्यातील मोसम व करंजाड खोऱ्याला गारांसह मुसळधार पावसाने झोडपले होते. या गारपिटीमध्ये कांदा, डाळिंंब, टमाटा, मिरची आदी पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली होती. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रु पयांचे नुकसान झाले. महसूल विभागानेही तत्काळ पंचनामा करण्यास प्रारंभ केला होता. पंचनामा प्रक्रि या सुरु असताना द्याने येथील शेतकरी शैलेश कापडणीस यांनी पंचनामा झाल्यानंतर तत्काळ भरपाई मिळावी अन्यथा आत्मदहन करू असा इशारा तहसीलदार सुनील सैंदाणे यांना दिला होता. मात्र तीन आठवडे उलटले तरी अद्याप नुकसानभरपाई न मिळाल्याने सोमवारी दुपारी सव्वाबारा वाजेच्या दरम्यान शैलेश कापडणीस यांनी तहसीलदार सैंदाणे यांचे दालन गाठले आणि भरपाईस विलंब का होतोय म्हणून जाब विचारत असतानाच अचानक खिशातून आगपेटी काढून स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तहसीलदार सैंदाणे व पोलीस कर्मचाऱ्यांनी वेळीच अटकाव केल्याने पुढील अनर्थ टळला .
आदेशानंतर भरपाई
तहसीलदार सैंदाणे म्हणाले की, तालुक्यात झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे करून तसा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला आहे. शासनाच्या पुढील आदेशानुसारच भरपाई मिळेल. अनुदान प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर भरपाई जमा करण्यात येईल, असे स्पष्ट केले.