द्राक्ष तपासणीच्या नावाखाली उत्पादकांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 03:10 PM2018-03-03T15:10:54+5:302018-03-03T15:10:54+5:30

द्राक्ष उत्पादक शेतक-यांना निर्यातदारांकडून विशिष्ट प्रयोगशाळेची अट घातली जात आहे. तसेच प्रयोगशाळांकडून शेतक-यांना रासायनिक अवशेष तपासणी अहवाल मिळत नसल्याचीही शेतक-यांची तक्रार आहे. रासायनिक अंशाचे प्रमाण अधिक असल्याची बतावणी करत व्यापारी कमी भावाने द्राक्ष खरेदी करत आहेत.

Farmers cheating in the name of grape checks | द्राक्ष तपासणीच्या नावाखाली उत्पादकांची फसवणूक

द्राक्ष तपासणीच्या नावाखाली उत्पादकांची फसवणूक

Next
ठळक मुद्देछगन भुजबळ यांनी लक्ष वेधले : कृषीमंंत्र्यांना लिहीले पत्र तपासणी अहवालाची माहिती शेतक-यांना एसएमएस, व्हाटसअ‍ॅप, ई-मेल वर मिळत नाही

नाशिक : द्राक्ष उत्पादक शेतक-यांच्या द्राक्ष रासायनिक अवशेष तपासणी अहवालाची माहिती शेतक-यांना एसएमएस, व्हाटसअ‍ॅप, ई-मेल वर मिळत नसल्याने शेतक-यांची फसवणूक होत असून, निर्यातदारांकडून काही विशिष्ट प्रयोगशाळेतूनच द्राक्षाची चाचणी करण्याचा आग्रह धरतात व या प्रयोगशाळा परस्पर निर्यातदारांना त्याचा अहवाल पाठवित असल्याने द्राक्ष उत्पादक शेतक-यांची मोठी फसवणूक होत आहे. त्यामुळे शेतक-यांना एसएमएस, व्हाटसअ‍ॅप, ई-मेलवर तपासणी अहवाल मिळावे अशा मागणीचे पत्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे कृषी व फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर यांना दिले आहे.
छगन भुजबळ यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, द्राक्ष उत्पादक शेतक-यांना निर्यातदारांकडून विशिष्ट प्रयोगशाळेची अट घातली जात आहे. तसेच प्रयोगशाळांकडून शेतक-यांना रासायनिक अवशेष तपासणी अहवाल मिळत नसल्याचीही शेतक-यांची तक्रार आहे. रासायनिक अंशाचे प्रमाण अधिक असल्याची बतावणी करत व्यापारी कमी भावाने द्राक्ष खरेदी करत आहेत. परिणामी व्यापा-यांकडून फसवणूक होत असल्याची शेतक-यांच्या तक्रारी आहेत. नाशिक जिल्ह्यात तीस हजारांहून अधिक द्राक्ष निर्यातदार शेतकरी असून या शेतक-यांची द्राक्षे परदेशात जात असतात. युरोपमध्ये द्राक्षाला अधिक भाव मिळत असल्याने आपली द्राक्षे युरोपमध्येच जावीत अशी प्रत्येक शेतक-याची भावना आहे. त्यासाठी द्राक्षाचा अंशदर कमीत कमी असणे गरजेचे असते, मात्र प्रयोगशाळांकडून तपासणीचा अहवाल शेतक-यांना न पाठवता निर्यातदार व्यापा-यांना पाठवला जात असल्यामुळे व्यापारी सांगतील तसा अंशदर शेतक-यांना मान्य करावा लागून याचाच फायदा व्यापारी उठवत आहेत.
द्राक्षांमध्ये अंशदर अधिक असून तुमची द्राक्षे युरोपला जाऊ शकत नसल्याचे सांगून युरोपऐवजी इतर देशात तुमची द्राक्षे पाठवावी लागतील अशी बतावणी करत व्यापारी द्राक्षांचे भाव पाडत आहेत. त्यामुळे द्राक्षांचे रासायनिक अवशेष तपासणी अहवाल व्यापा-यांसोबतच शेतक-यांना त्यांच्या मोबाईलवर, व्हॉटसअ‍ॅपवर वा ई-मेलवर मिळावे अशी शेतक-यांची मागणी आहे. तरी,सदर प्रकरणी वैयक्तिकरित्या लक्ष घालून द्राक्ष निर्यातदार शेतक-यांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावे अशी मागणी छगन भुजबळ यांनी आपल्या पत्रात केलेली आहे.

 

Web Title: Farmers cheating in the name of grape checks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.