जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:29 AM2020-12-14T04:29:57+5:302020-12-14T04:29:57+5:30
नाशिक : नव्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यातील आंदोलन सुरू केले ...
नाशिक : नव्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यातील आंदोलन सुरू केले जाणार आहे. गेल्या मंगळवारी बंद पुकारण्यात आल्यानंतर सोमवारी (दि.१४) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली जाणार आहेत, याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
दिल्लीत अजूनही शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या समर्थनार्थ जिल्ह्यात आंदोलने केेली जात असून, सोमवारी पुन्हा एकदा तीव्र आंदोलनाची तयारी करण्यात आली आहे. देशातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर होणाऱ्या आंदोलनांसारखेच नाशिक जिल्ह्यातही आंदोलन केले जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले जाणार आहे.
शेतकरीविरोधी तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. कडाक्याच्या थंडीमध्ये शेतकरी दिल्लीच्या भोवती हायवेवर ठिय्या मांडून बसले आहेत. या पार्श्वभूमीवर आंदोलक शेतकऱ्यांनी १४ डिसेंबर रोजी संपूर्ण देशात जिल्हाधिकारी कार्यालयांच्या प्रवेशद्वारावर निदर्शने, धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
सकाळी ११ ते ३ या वेळेत शिवाजी महाराज पुतळा, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय जिल्ह्यातील सर्व संघटनांनी घेतला आहे. या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन सामाजिक तसेच शेतकरी संघटनांकडून करण्यात आले आहे. आंदोलनात सहभागी होणाऱ्यांनी आपापल्या संघटनेचे बॅनर, झेंडे घेऊन यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. धरणे आंदोलनाच्या वेळी केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे, कामगार कायदे, वीज कायदा २०२०, नवे शैक्षणिक धोरण, बेरोजगारी याबाबत अनेक वक्ते मनोगत व्यक्त करणार आहेत.
पत्रकार परिषदेला माकपाचे डॉ. डी एल कराड, किसान सभा सुनील मालुसरे, काँग्रेसचे शरद आहेर, राष्ट्रवादी रंजन ठाकरे, भाकपचे राजू देसले, महादेव खुडे, शेकापचे ॲड. मनीष बस्ते, वंचित आघाडीचे वामनराव गायकवाड, बसपाचे अरुण काळे, राष्ट्र सेवा दलाचे नितीन मते, एनएपीएमचे अनिता पगारे, किरण मोहिते, रिपाइं कवाडे गटाचे शशिकांत उन्हवणे, अण्णासाहेब कटारे, छात्रभारतीचे समाधान बागुल, अजमल खान, विराज देवांग , सीताराम ठोंबरे नामदेव बोराडे असे आवाहन जनआंदोलन समन्वय समितीने केले आहे.