शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई नको!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:16 AM2021-06-09T04:16:36+5:302021-06-09T04:16:36+5:30
चांदवड : महाडीबीटी पोर्टलवर अनुदानित बियाण्यांसाठी ऑनलाईन अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून बियाणे खरेदीसाठी परवानावाटप करण्यात येत आहे. तालुक्यातील ...
चांदवड : महाडीबीटी पोर्टलवर अनुदानित बियाण्यांसाठी ऑनलाईन अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून बियाणे खरेदीसाठी परवानावाटप करण्यात येत आहे. तालुक्यातील शेतकरीबांधवांनी ७५ ते १०० मिलीमीटर पाऊस पडल्यावर पेरणी करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी विलास सोनवणे यांनी केले आहे. तालुक्यातील शेतकरीबांधवांनी महाडीबीटी पोर्टलवर अनुदानित बियाण्यांसाठी ऑनलाईन अर्ज केलेले होते. त्यात सोडतीद्वारे निवड झालेल्या शेतकरीबांधवांना कृषी विभागामार्फत परवाना देण्यात येत आहे. तसेच पीक प्रात्यक्षिकांसाठी निविष्ठावाटप करण्यात येत आहे. मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल झालेला असून येत्या दोनतीन दिवसांत संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार आहे. ७५ ते १०० मिलीमीटर पाऊस पडल्यावर जमिनीमध्ये पुरेशा खोलीवर ओलावा जातो व पेरणीनंतर बियाण्यांची चांगली उगवण होते. पुरेसा पाऊस झाल्यावरच शेतकरीबांधवांनी पेरणी करावी. पावसाचा खंड पडल्यास पिके तग धरू शकतील, अन्यथा दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते. उत्पादन खर्चात वाढ होऊन शेतकरीबांधवांचे आर्थिक नियोजन कोलमडू शकते. त्यामुळे सद्यस्थितीत शेतकरीबांधवांनी पूर्वमशागतीची कामे पूर्ण करून बियाणे पेरणीची घाई न करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी विलास सोनवणे यांनी केले आहे.