अंधश्रद्धेपोटी शेतकरी घेत नाही तागाचे पीक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 06:02 PM2018-10-02T18:02:17+5:302018-10-02T18:06:23+5:30
नाशिक तालुक्यातील पिढ्यान पिढ्यांनी आजवर पाळलेले हे निर्बंध पाहून कोणी याला श्रद्धा तर कोणी अंधश्रद्धा म्हणूनही पाहत असले तरी, वस्तुस्थिती मात्र नाकारता येत नाही. कोटमगावचे ग्रामदैवत मांगीर बाबा (मांग वीर बाबा) असून, या दैवताला ताग वर्ज्य आहे.
नाशिक : नैसर्गिक खत व दोरखंड तयार करण्यासाठी शेतीला उपयुक्त ठरणाऱ्या ताग पिकाचे फायदे शेतकरी जाणून असतानाही नाशिक तालुक्यातील कोटमगाव हे एकमेव गाव पिढ्यान् पिढ्यांपासून तागाची ना शेती करत, ना तागाच्या शेतात कामाला जात. श्रद्धा-अंधश्रद्धेच्या खेळात संपूर्ण गाव तागाच्या शेतीपासून आजवर वंचित राहिले असून, ज्याने कोणी तसा प्रयत्न केला तर त्याच्यावर अरिष्ट कोसळल्याच्या अख्यायिकेमुळे आजवर तसे धाडस कोणी केले नाही. त्यामागचे कारण म्हणजे गावाच्या ग्रामदैवताला असलेले ताग पिकाचे वर्ज्य.
नाशिक तालुक्यातील पिढ्यान पिढ्यांनी आजवर पाळलेले हे निर्बंध पाहून कोणी याला श्रद्धा तर कोणी अंधश्रद्धा म्हणूनही पाहत असले तरी, वस्तुस्थिती मात्र नाकारता येत नाही. कोटमगावचे ग्रामदैवत मांगीर बाबा (मांग वीर बाबा) असून, या दैवताला ताग वर्ज्य आहे. त्यामुळे येथील शिवारात कोणीही तागाची लागवड केली तर त्या शेतकºयाच्या कुटुंबावर काहीतरी अरिष्ट कोसळते असा समज आहे. मात्र कोटमगावच्या शिवारालगत असलेले सामनगाव, जाखोरी, हिंगणवेढे, एकलहरे येथील शेतकरी वर्षानुवर्षे आपल्या शेतात तागाचे पीक घेत असून, त्यातून चांगले उत्पन्नही काढत आहेत. त्यांना मात्र कोणत्याही दुर्घटनेला सामोरे जावे लागत नसल्याचे सांगितले जाते. तथापि, ज्या गावांमध्ये तागाचे पीक घेतले जाते, त्या गावांमध्ये पेरलेल्या तागाच्या शेतीत कामासाठी कोटमगावचे शेतकरी काही केल्या जात नाहीत हीदेखील वस्तुस्थिती आहे.
तागाचा उपयोग शेतीला नैसर्गिक खत म्हणून करतात, तर मोठ्या तागाला पाण्यात कुजवून त्यापासून दोरखंड तयार केला जातो. शेतीला दुहेरी उपयोगी पडणारे हे पीक जरी असले तरी, कोटमगावचे ग्रामदैवत मांगीरबाबाला ताग वर्ज्य असल्याने कोणीच तागाचे पीक घेत नाही. मांगीरबाबा नवनाथांपैकी एक असल्याची आख्यायिका आहे. गावातील सर्वांत वयोवृद्ध शेतक-याशी प्रस्तृत प्रतिनिधीने संपर्क साधल्यावर त्यांनी पिढ्यान पिढ्या ही प्रथा चालत आल्याचे सांगितले. तागामुळे मांगीरबाबाची अवकृपा होते व अरिष्ट कोसळते अशी भीती गावकºयांमध्ये असल्यामुळे येथील शेतकरी तागाचे पीक घेण्याचे धाडस करत नाहीत. मांगीरबाबमुळे आमच्या गावात शांतता नांदते. त्यासाठी चैत्र महिन्यात मांगीरबाबाची मोठी यात्रा भरते. त्यासाठी कै. शंकर खंडू घुगे यांच्या जागेवर मंदिर बांधलेले आहे. यात्रेच्या काळात संपूर्ण शेत मोकळे ठेवले जाते.
प्रतिक्रिया===
कोटमगावला ताग पेरत नाहीत हे शंभर टक्के खरे आहे. आमच्या मागच्या पिढ्यांपासून ही प्रथा चालत आली आहे. ग्रामदैवत मांगीरबाबा यांचे जागृत देवस्थान असून, गावात जशी इतर चार-पाच मंदिरे आहेत तसे मांगीरबाबाचेही मंदिर आहे. बाबाला ताग धार्जिना नाही म्हणून आम्ही ताग करीत नाही. आमच्या गावातील एक ट्रॅक्टरवाला पैशाच्या हव्याशापोटी शेजारच्या गावातील तागाच्या शेतात काम करण्यासाठी गेला. त्याचा ट्रॅक्टरही बिघडला आणि त्याच्या सगळ्या अंगाला खाज सुटली अशी अनेक उदाहरणे आमच्या डोळ्यासमोर घडली आहेत.
-महादेव पुंजाजी घुगे ऊर्फ चेअरमनबाबा