खेडगाव परिसरातील रस्त्यांमुळे शेतकरी, वाहनचालक संतप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2020 05:07 PM2020-03-04T17:07:46+5:302020-03-04T17:08:24+5:30
खेडगाव : परिसरातील रस्त्यांच्या दूरवस्थेकडे दोन ते तीन वर्षांपासून लोकप्रतिनिधी व बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने शेतकरी व वाहनचालक संतप्त झाले आहेत. शेतकऱ्यांच्या दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या खेडगाव व परिसरातील रस्त्यांच्या दुरूस्तीकडे लवकरात लवकर लक्ष न दिल्यास आक्रमक पवित्रा घेतला जाईल अशा संतप्त प्रतिक्रिया आता उमटू लागल्या आहेत.
लखमापूर फाटा ते शिंदवड , खेडगाव ते गोंडेगाव व मुखेड, खेडगाव ते वडनेर भैरव रस्ता ,खेडगाव ते खेडगाव ऐरिगेशन कॉलनी रस्ता, खेडगाव ते बहादूरी रास्ता असे सगळ्या बाजूने खेडगावला जोडणारे रस्ते पायी चालण्याच्या योग्यतेचे राहिले नसून वाहनचालकांसाठी जोखमीचे झाले आहेत. सर्व लोप्रतिनिधींना व सार्वजनिक बांधकाम विभागाला लेखी व तोंडी स्वरूपात निवेदने देऊनही प्रशासनाने कोणतेही पाऊल उचलले नाही. खेडगाव परिसर व त्याला जोडणाºया या रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. या खराब रस्त्यामुळे धुळीचे साम्राज्य पसरले असून शेतकऱ्यांच्या द्राक्षबागांनाही या धुळीचा मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. त्यामुळे त्वरीत या रस्त्याची दुरु स्ती करण्यात यावी अशी मागणी नागरिक व वाहनचालकांकडून केली जात आहे. सध्या द्राक्ष काढणीला वेग आला असून या रस्त्यामुळे परराज्यातील व्यापारी या भागात फिरकत नसल्याने शेतक-यांची आर्थिक कोंडी होत आहे. हातातोंडाशी आलेला घास या धुळीने हिरावून घेतला आहे. नागरिकांच्या आरोग्यावरही या धुळीचा परिणाम होत असल्याने रु ग्णांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे खेडगाव व परिसरातील रस्त्याची दुरु स्ती करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी व शेतक-यांनी केली आहे.