द्राक्षबागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2020 09:36 PM2020-10-30T21:36:47+5:302020-10-31T00:35:23+5:30
खेडलेझुंगे : द्राक्षबागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत सुरू असून, पावसाच्या उघडिपीमुळे शेतकामांना वेग आला आहे.
खेडलेझुंगे : द्राक्षबागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत सुरू असून, पावसाच्या उघडिपीमुळे शेतकामांना वेग आला आहे. मे-जून महिन्यामध्ये द्राक्षपंढरी समजल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यामध्ये शेजारील तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर मजूर स्थलांतिरत होत असतो. परंतु कोरोनामुळे परिसरातून मजुरांचे स्थलांतर खूपच अत्यल्प आहे. तसेच सततच्या पावसामुळे शेतकामे मंदावलेली होती. त्यातच मजुरांचा तुटवडा यामुळे कामांचा वेग मंदावलेला होता. त्यातच शेतीमालाला मिळणारा अत्यल्प भाव यामुळे शेतकरीवर्ग मेटाकुटीला आला आहे. त्यातच कांदा निर्यातबंदी केल्याने बाजारपेठा बंद झालेल्या होत्या. त्यातच कोरोनामुळे शेताकामासाठीचे मजूर उपलब्ध होत नसल्याने या हंगामातील शेतीकामांना उशीर झालेला आहे. त्यातच निफाडच्या पूर्व भागात सतत पाऊस सुरू होता. यात पूर्व हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. मोठ्या प्रमाणावर शेतात पाणी साचून राहिल्याने मका, सोयाबीन पिके डोळ्यादेखत सडण्याची भीती निर्माण झालेली होती. त्यामुळे पावसाचा वाढता जोर बघून परिसरातील शेतकऱ्यांना कांदा, सोयाबीन, मका आदी पिकांचीही अपेक्षा सोडलेली होती. परंतु मागील चार-पाच दिवसांपासून पाऊस थांबलेला असल्याने शेतकऱ्यांना पुन्हा अपेक्षा लागलेली आहे. सद्या शेतकऱ्यांना पिकांची स्थिती सुधारण्यासाठी अनेक प्रकारच्या महागड्या औषधांच्या फवारण्या कराव्या लागत आहे.
दिवसभर उन्हाचा तडाखा आणि सायंकाळी जोरदार ढगफुटीसारखे पाऊस या सततच्या वातावरणातील बदलामुळे द्राक्ष बागायतदारांना कधी दिवसा तर कधी रात्रीची औषध फवारण्या कराव्या लागत आहेत. रात्री पाऊस झाल्यास भल्या पहाटे पडणाऱ्या धुक्यांमुळे मोठ्या प्रमाणावर दवबिंदू वेलीवर साचतात. त्यामुळे भागातील द्राक्षबागांवर डावण्या, करपा, बुरशी या रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. बुरशीजन्य रोगाबरोबरच कळी गळीचाही सामना करावा लागत आहे. कळीच्या स्थितीमध्ये करपा आणि फुलोऱ्याच्या अवस्थेत प्रामुख्याने डावण्या रोगाला बळी पडत आहेत. करप्याने कोवळी फूट, कोवळे घड करपून जाऊ लागले आहेत.