शेतकरी कुटुंबांची होणार राष्ट्रीय पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2019 12:36 AM2019-01-26T00:36:02+5:302019-01-26T00:36:18+5:30
नियोजन विभाग व सांख्यिकी संचालनालामार्फत कुटुंबांची जमीन व पशुधारणा आणि शेतकरी कुटुंबाच्या परिस्थितीची मूल्यांकन पाहणी तसेच कर्जे व गुंतवणूक या संदभार्तील ७७ वी राष्ट्रीय नमुना पाहणी घेण्यात येत असून सर्वेक्षणाचे क्षेत्रकाम जानेवारी ते डिसेंबर २०१९ या कालावधीत होणार आहे.
नाशिक : नियोजन विभाग व सांख्यिकी संचालनालामार्फत कुटुंबांची जमीन व पशुधारणा आणि शेतकरी कुटुंबाच्या परिस्थितीची मूल्यांकन पाहणी तसेच कर्जे व गुंतवणूक या संदभार्तील ७७ वी राष्ट्रीय नमुना पाहणी घेण्यात येत असून सर्वेक्षणाचे क्षेत्रकाम जानेवारी ते डिसेंबर २०१९ या कालावधीत होणार आहे.
सर्वेक्षणात शेतकरी कुटुंबांचे आर्थिक राहणीमान, त्यांच्या ताब्यात असलेली जमीन, पिकांच्या लागवडीखालील क्षेत्र, त्यापासून मिळणारे उत्पन्न व त्यासाठी होणार खर्च, पिकांना मिळणारी आधारभूत किंमत, सिंचनाचे स्रोत, शेतकरी कुटुंबाकडे असलेले पशुधन व त्यापासून मिळणारे उत्पन्न, इत्यादी माहिती ग्रामीण भागात संकलित करण्यात येणार आहे. याचबरोबर ग्रामीण व नागरी भागाकरिता निवड केलेल्या कुटुंबांकडे त्यांनी केलेली गुंतवणूक व त्यांच्यावर असलेले कर्ज, त्यांच्याकडे असलेल्या स्थावर मालमत्ता व व्यवसायाबाबतची सविस्तर महिती संकलित करण्यात येणार आहे. नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार व अहमदनगर या जिल्ह्यात या ऐच्छिक पद्धतीने निवड केलेल्या कुटुंबांना दोन वेळा भेट देऊन विशिष्ट नमुन्यात माहिती संकलित करण्यात येईल. या पाहणीतील निष्कर्षाच्या उपयोग कर्ज विषयक धोरणे आखण्यासाठी व नियोजनासाठी केला जाणार असल्याने सर्वेक्षणासंबंधातील परीपूर्ण व योग्य माहिती देऊन सर्वेक्षणाच्या राष्ट्रीय कामास निवड केलेल्या कुटुंबांनी सहकार्य करावे, असे आवाहन दिनेश वाघ यांनी केले.