अफवांच्या लाटेत भरडला शेतकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 09:58 PM2020-03-19T21:58:31+5:302020-03-20T00:11:40+5:30
जगभरात कोरोनाने घातलेल्या थैमानाने येवला तालुक्यातील व्यावसायिक व शेतकरी वर्गावर खूप मोठा विपरीत परिणाम झालेला दिसत आहे.
येवला : जगभरात कोरोनाने घातलेल्या थैमानाने येवला तालुक्यातील व्यावसायिक व शेतकरी वर्गावर खूप मोठा विपरीत परिणाम झालेला दिसत आहे. सोशल मीडियावरील अफवांमुळे एकीकडे कोरोनामुळे परिसरातील शेतीला जोडधंदा शेळीपालन, पोल्ट्री व्यवसाय धोक्यात आले असून, व्यावसायिक बेरोजगारीच्या वाटेवर आहे तर दुसरीकडे त्यापटीत भाजीपाला व फळांना मागणी वाढायला हवी, पण तसं न होता याच्या दरात फारशी वाढ झाली नाही.
मागील वर्षी मका पिकाला सरासरी दोन हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला, तर चालू हंगामात १२०० ते १४०० सरासरी दर मिळत आहे.
त्यात पोल्ट्रीफीडमध्ये मका हे मुख्य असून, पोल्ट्री व्यवसाय जर बंद पडले तर मक्याला मागणी कमी होत आहे.
दरात आणखी घसरण होण्याची भीती आहे. शिवाय चालू वर्षी अतिपावसाने कांदा रोपे सडल्यामुळे उन्हाळी मका लागवडीचे प्रमाणही वाढले आहे. कांदा, द्राक्ष, डाळिंब, मका यांना बाहेरील देशात मागणी घटल्यास शेतकऱ्यांच्या चिंतेत अधिक वाढ झाली आहे. सदर परिस्थिती अशीच राहिली तर शेतकरी वर्ग, शेळीपालन अशा अनेक व्यवसायांवर गदा येण्याची शक्यता आहे.
शिक्षणानंतर नोकरीच्या शोधात न लागता पोल्ट्रीफार्म हा व्यवसाय निवडला, मात्र कोरोनाच्या भीतीपोटी व्यवसाय बंद करून बेरोजगार होण्याची वेळ आली.
- सचिन दाते, व्यावसायिक, जळगाव
चालू वर्षी अतिपावसाने पिके सडली. कांदा लागवड उशिरा होऊन उत्पन्नावर परिणाम झाला. कोरोनाच्या भीतीपोटी निघालेल्या द्राक्ष उत्पन्न बाजारात गेले नाही तर वारेमाप नुकसान होईल.
- विनोद वावधाने, शेतकरी, मानोरी