शेतकरी हवालदिल : मजुरांअभावी उत्पादकांना मोठा भुर्दंड 900 हेक्टर ऊस तोडणीच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 12:14 AM2018-01-05T00:14:10+5:302018-01-05T00:20:07+5:30
सायखेडा : निफाड तालुक्यातील निफाड आणि रानवड सहकारी साखर कारखाने बंद असल्याने तालुक्या-बाहेरील कारखान्यांना ऊसतोडणी करण्यासाठी विनवणी करण्याची वेळ आली आहे.
सायखेडा : निफाड तालुक्यातील निफाड आणि रानवड सहकारी साखर कारखाने बंद असल्याने तालुक्या-बाहेरील कारखान्यांना ऊसतोडणी करण्यासाठी विनवणी करण्याची वेळ आली आहे. परिणामी कारखाना कर्मचाºयापेक्षा ऊसतोडणी करणाºया टोळीच्या मुकादमांना ‘अच्छे दिन’ आले असून, तोडणीसाठी कारखान्याने निश्चित केलेल्या दरापेक्षा एकरी पंधरा ते वीस हजार रुपये मुकादम घेऊन ऊसतोडणी करत असल्याने तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.
निफाड तालुक्यात गोदावरी, कादवा, दारणा, बाणगंगा, पालखेड कालवा, डावे कालवे, कडवा कॅनॉल असल्याने मुबलक पाणी, नदीचे खोरे असल्याने काळी कसदार जमीन यामुळे तालुक्यात उसाचे क्षेत्र वाढले आहे. ऊस लागवड मोठ्या प्रमाणावर होते. शिवाय गोदाकाठच्या उसाला रिकव्हरी जास्त प्रमाणात असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणावर ऊस लागवड करतात. अनेक दशके गोदाकाठ भागात सर्वाधिक ऊस लागवड क्षेत्र असल्याने निफाड तालुक्यात निसाका आणि रासाका असे दोन कारखाने उभारले गेले. एकेकाळी दोन कारखान्यांना पुरवठा केला जाईल एवढा ऊस पिकवला जात होता. आजदेखील परिस्थिती जैसे थे आहे. क्षेत्र तितकेच आहे मात्र दोन्ही कारखाने बंद पडले आहेत. तालुक्यातील सहकाराला लागलेली घरघर अखेर शेतकºयांच्या मुळावर येऊन ठेपली आहे. नदीलगत ऊस लागवड केल्याशिवाय शेतकºयांना पर्याय नाही आणि स्वत:च्या हक्काचे कारखाने बंद पडले आहेत त्यामुळे नगर जिल्ह्यातील कारखान्यांना योग्य प्रतीचा ऊस निफाड तालुक्यात मिळू लागला आहे. ऊस उत्पादकदेखील कोळपेवाडी, कोपरगाव, लोणी, प्रवरा या कारखान्यांना ऊस देत आहे. कारखाने योग्य भाव देऊन ऊस खरेदी करत असले तरी ऊसतोडणी करणारी मजुरांची टोळी सांभाळण्यासाठी शेतकºयांना कसरत करावी लागत आहे. टोळीचा मुकादम जिथे सांगेल तिथे टोळी ऊसतोडणी करण्यासाठी जाते. ऊसतोडणी करण्यासाठी कारखान्याचा प्रशासकीय अधिकारी म्हणून स्लिप मास्तर यांची नियुक्ती केलेली असते. एकेकाळी स्लिप मास्तरचा शब्द अंतिम असायचा. मुकादम अथवा मजूर यांनी कोणतीही सबब न सांगता स्लिप मास्तर ज्या शेताची स्लिप बनवून मुकादमाकडे देत असे त्या शेतात टोळी जात असे. आता मात्र मुकादम स्लिप मास्तर यांना न जुमानता जो शेतकरी आर्थिक देवाण-घेवाण करतो त्या शेतकºयाच्या शेतात काम करण्यासाठी जात असल्याने शेतकºयांना मोठा आर्थिक भुर्दंड बसत आहे. ऊसतोडणी लवकर पूर्ण करण्यासाठी शेतकरी मुकादमांना पैसे देऊन ऊसतोडणी करून घेत आहेत. या मुकादमराजमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. नाशिक व नगर जिल्ह्यात सर्वाधिक जास्त प्रमाणात ऊस पिकविणारा तालुका म्हणून निफाड तालुक्याची परंपरा आहे. यामुळे तालुक्यातील मोठ्या गाळप करणारे दोन साखर कारखाने बंद पडल्याने आज ऊस उत्पादक शेतकरी ऊसतोडणी होत नाही. मुकादम, मजूर यांच्या अवास्तव मागण्या आणि मनमनीला आळा घालण्यासाठी तालुक्यातील पुढाºयांनी संबंधित कारखान्याच्या प्रशासकीय अधिकारी आणि अध्यक्ष, संचालक मंडळ यांच्याशी चर्चा करून दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.