किसान सन्मान निधी खात्यात जमा अन् परतही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 01:54 AM2019-02-26T01:54:50+5:302019-02-26T01:55:19+5:30
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर लगीनघाई करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजना फार्स आहे की काय, अशी शंका निर्माण झाली आहे.
नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर लगीनघाई करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजना फार्स आहे की काय, अशी शंका निर्माण झाली आहे. सिन्नर येथील एका शेतकऱ्याच्या नावावर दुपारी दोन हजार रुपये जमा झाले आणि अवघ्या काही तासांतच ही रक्कम परत काढून घेण्यात आल्याचा प्रकार घडला.
केंद्र सरकारने अंदाजपत्रकात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना घोषित केली होती आणि लोकसभा निवडणुका तोंडावर असल्याने घाईघाईने त्याची अंमलबजावणी करण्यासाठी शेतकऱ्यांची माहिती संकलित करण्यात आली आहे. नाशिक विभागात दहा लाख तर जिल्ह्यात तीन लाख शेतकरी लाभेच्छुक असतील, असे शासकीय सूत्रांनी सांगितले. रविवारी (दि. २४) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरखपूर येथे या योजनेचा शुभारंभ केल्यानंतर महाराष्ट्रातदेखील विभाग स्तरावर कार्यक्रम झाले. यशवंतराव चव्हाण महाराष्टÑ मुक्त विद्यापीठात या योजनेचा शुभारंभ विभागीय आयुक्त राजाराम माने यांच्या हस्ते करण्यत आला. त्याचवेळी जिल्ह्यातील ८ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर रविवारीच (दि. २४) दोन हजार रुपयांचा निधी जमा झाल्याचे सांगण्यात आले.
नाशिक जिल्ह्णातील अशोक लहागमे यांना दुपारी दोन हजार रुपये जमा झाल्याचा एसएमएस प्राप्त झाला. त्यामुळे त्यांना काहीसे समाधान वाटले, परंतु ते औट घटकेचे ठरले. दुपारी त्यांच्या खात्यातून सदर रक्कम परत काढून घेण्यात आल्याचा एसएमएस मोबाईलवर आला. परंतु रविवारची सुट्टी असल्याने हा काय प्रकार आहे हे विचारण्यासाठी बॅँकेत जाण्याची सोय नव्हती. सोमवारी (दि. २५) स्टेट बॅँक आॅफ इंडियाच्या सिन्नर येथील शाखेशी संपर्क साधला. त्यावेळी पासबुकमध्येही पैसे जमा झाल्याची आणि काढून घेतल्याची नोंद झाली. परंतु याबाबत काही माहिती नाही. मुंबईत हेड आॅफिसला मेल करा, असे सांगून या शाखेच्या अधिकाºयांनी हात वर केले. त्यामुळे सन्मानधन योजना केवळ शुभारंभापुरतीच होती काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
नाशिकमध्ये अनेक शेतकºयांच्या बाबतीत हा प्रकार घडला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकरी अल्प शिक्षित किंवा शिकलेले नसल्याने बॅँकेच्या खात्यात मेल करून काय माहिती घेणार, असा प्रश्न लहामगे यांनी उपस्थित केला आहे.
शेतकºयांचा हा अपमान
किसान सन्मान अंतर्गत शेतकºयांच्या बॅँक खात्यावर वर्ग केलेले पैसे परत घेतले जात असल्याच्या बातम्या कानावर आल्या. ही बाब अत्यंत खेदजनक व शेतकºयांचा अपमान करणारी आहे. साडेचार वर्षांपूर्वी नाकर्तेपणावर निवडणुकीपूर्वी पांघरून घालण्यासाठी सत्ताधाºयांकडून चालविलेल्या घिसाडघाईमुळेच असा गोंधळ उडालेला आहे. त्यामुळे शेतकºयांना दिलासा तर मिळालाच नाही; मात्र वाट्याला मनस्तापच आला.
- डॉ. अजित नवले, राज्य सरचिटणीस, किसान सभा
..