लक्ष्मीनगर येथील शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:14 AM2021-01-22T04:14:39+5:302021-01-22T04:14:39+5:30
मांडवड : मागील पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे लक्ष्मीनगर येथील शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानाची भरपाई ताबडतोब अदा करावी, अशी मागणी नांदगावचे ...
मांडवड : मागील पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे लक्ष्मीनगर येथील शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानाची भरपाई ताबडतोब अदा करावी, अशी मागणी नांदगावचे तहसीलदार व कृषी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
पाच ते सहा महिन्यांपूर्वी नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते. त्यावेळी नुकसानाचे पंचनामेदेखील करण्यात आले होते. पंचनामे करुन शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे राज्य शासनाचे आदेश असताना अन्य गावातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम मिळाली. मात्र, लक्ष्मीनगर येथील शेतकरी या भरपाईपासून अद्यापही वंचित आहेत. या भागातील नुकसानाचे पंचनामे करणारे अधिकारी कोण होते व त्या पंचनाम्यांचे काय झाले, याचा शोध घेऊन संबंधितांची चौकशी करावी व लक्ष्मीनगर येथील शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
गावातील बऱ्याच शेतकऱ्यांनी पीक विम्याची रक्कमही भरलेली होती. यातील काही शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसेदेखील मिळाले आहेत. त्यामुळे लक्ष्मीनगर परिसरातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई तत्काळ मिळवून द्यावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. हे निवेदन नांदगाव येथील कृषी विभागात डी. जी. जांभळे यांना देण्यात आले. या निवेदनावर पुष्पा रायते, शिवाजी उगले, अनिल घाडगे, राजाराम गरुड, रावसाहेब भोकनळ, जमुना भोकनळ, ज्योती उगले, बळीराम दरगुडे, सुनीता घाडगे व योगेश सोनवणे यांच्या सह्या आहेत.
===Photopath===
210121\21nsk_36_21012021_13.jpg
===Caption===
नांदगावच्या कृषी विभागात डी. जी. जांभळे यांना निवेदन देताना लक्ष्मीनगरचे शेतकरी योगेश सोनवणे, बळीराम दरगुडे. रावसाहेब भोकनळ, अनिल घाडगे आदी.