महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची दिल्लीकडे कूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 02:09 AM2020-12-22T02:09:53+5:302020-12-22T02:10:14+5:30
केंद्र सरकारने आणलेल्या नवीन तीनही कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या २५ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर ठिय्या देणाऱ्या शेतकऱ्यांपैकी ३६ शेतकऱ्यांचे बळी गेले असतानाही दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे केंद्रातील सरकारने हे कायदे शेतकऱ्यांच्या नव्हे तर उद्योगपतींसह परदेशी भांडवलदारांच्या फायद्यासाठी आणल्याचा आरोप करीत महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सोमवारी (दि. २१) नाशिकहून राजधानी दिल्लीच्या दिशेने कूच केली.
नाशिक : केंद्र सरकारने आणलेल्या नवीन तीनही कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या २५ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर ठिय्या देणाऱ्या शेतकऱ्यांपैकी ३६ शेतकऱ्यांचे बळी गेले असतानाही दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे केंद्रातील सरकारने हे कायदे शेतकऱ्यांच्या नव्हे तर उद्योगपतींसह परदेशी भांडवलदारांच्या फायद्यासाठी आणल्याचा आरोप करीत महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सोमवारी (दि. २१) नाशिकहून राजधानी दिल्लीच्या दिशेने कूच केली.
अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वात राज्यभरातील हजारो शेतकरी सोमवारी नाशिकमधील गोल्फ क्लब मैदानावर जमत इन्कलाब जिंदाबादच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह उद्योजक, भांडवलदारशाही विरोधातही घोषणाबाजी करीत मोदी व शाह यांच्या पोस्टरचे दहन करण्यात आले. यात सोलापूर, सातारा, कोल्हापूर, अहमदनगर, रायगड, रत्नागिरी, पालघर, महाड, मुंबई ठाणे यासह विविध जिल्ह्यांतून सुमारे ३ हजार शेतकरी व कामगारांनी सहभाग नोंदवला. या शेतकऱ्यांनी अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक ढवळे यांच्या नेतृत्वात आणि केरळचे खासदार के. के. रागेश यांच्या प्रमुख उपस्थित दिल्लीकडे प्रस्थान केले. यावेळी आमदार जयंत पाटील, माजी आमदार नरसय्या आडम, माजी आमदार जे, पी. गावीत, सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डी. एल. कराड, किसान सभेचे राज्य अध्यक्ष किसान गुज्जर, सचिव अजित नवले, राजू देसले, सुनील मालुसरे आदी विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
इन्फो-
पहिला मुक्काम चांदवडला
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाशिकमधून निघालेल्या शेतकरी मोर्चाचा पहिला मुक्काम चांदवडला होणार असून मंगळवारी (दि. २२)सकाळी चांदवडवरून पुन्हा दिल्लीच्या दिशेने मोर्चाचे प्रस्थान होणार आहे. यात उमराणे, मालेगाव असा प्रवास करून मोर्चेकरी धुळ्यात दाखल होतील. या प्रवासात ठिकठिकाणी विविध पक्ष व संघटना दिल्लीच्या दिशेने जाणाऱ्या शेतकरी मोर्चातील वाहनांच्या ताफ्याचे स्वागत करणार असून दुसऱ्या दिवसाचा मुक्काम शिरपूर येथे होणार आहे. त्यानंतर बुधवारी (दि. २३) तिसऱ्या दिवशी मोर्चेकऱ्यांच्या वाहनांचा हा ताफा मध्य प्रदेश, राजस्थान असा प्रवास करीत दिल्लीकडे मार्गक्रमण करणार असून शिरपूरपर्यंत यात सुमारे ५०० कामगारही सहभागी होणार आहे.