नाशिकमध्ये शेतकऱ्यांकडून शासकीय खरेदी केंद्रांवर मका नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 12:15 PM2018-12-28T12:15:06+5:302018-12-28T12:15:53+5:30

बाजारगप्पा : बाजारपेठांत मक्याच्या भावामध्ये ५० ते ६० रुपयांनी घट झाली आहे.

Farmers Maize registration at Government purchase centers in Nashik | नाशिकमध्ये शेतकऱ्यांकडून शासकीय खरेदी केंद्रांवर मका नोंदणी

नाशिकमध्ये शेतकऱ्यांकडून शासकीय खरेदी केंद्रांवर मका नोंदणी

googlenewsNext

- संजय दुनबळे ( नाशिक )

मागील सप्ताहाच्या तुलनेत नाशिक जिल्ह्यातील बाजारपेठांत मक्याच्या भावामध्ये ५० ते ६० रुपयांनी घट झाली आहे. शासनाकडून मक्याला १७१० रुपये हमीभाव दिला जात असल्याने अनेक शेतकऱ्यांनी शासनाच्या खरेदी केंद्रांवर मक्याची नोंदणी केली असल्याचे दिसून येत आहे. परिणामी बाजार समित्यांमध्ये होणारी मका आवक काहीशी मंदावली आहे. शेतकऱ्यांकडे असलेली बाजरीही संपल्यामुळे सध्या लासलगाव बाजार समितीत जालना, राजस्थान या भागातील व्यापाऱ्यांकडील बाजरी बघायला मिळते. 

नाशिक जिल्ह्यात यावर्षी मक्याचे उत्पादन घटल्याने सुरुवातीपासूनच बाजारात मक्याच्या आवकेवर परिणाम झाला आहे. दिवाळीनंतर मक्याची चांगल्या प्रकारे आवक सुरू  झाली आहे. मात्र होणारी आवक आणि मागणी यांचे प्रमाण व्यस्त असल्यामुळे यावर्षी खुल्या बाजारातही मका पिकाने १७२५ रुपये प्रतिक्विंटलचा टप्पा गाठला. यावर्षी शासनाने मक्याला १७१० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. खुल्या बाजारातही यावर्षी चांगला भाव मिळत असल्याने अनेक शेतकरी खुल्या बाजारातच मका विक्रीला पसंती देत आहे. मात्र मक्याचे वाढत असलेले भाव पाहून शेतकरीही सावध झाले आहेत. काही ठिकाणी शेतकरी शासकीय खरेदी केंद्रांवर मका पिकाची नोंदणी करत असल्याचे दिसून येत आहे. शासकीय केंद्रावरही मका विक्री केल्यानंतर चार दिवसांत शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा होत असल्याने शेतकऱ्यांचा कल शासकीय खरेदी केंद्राकडे वाढत असल्याचे दिसून येत आहे. वातावरणात झालेला बदल आणि माल बाहेर जाण्याचे प्रमाण कमी झाल्याने बाजार समित्यांमध्ये मक्याचे भाव काही प्रमाणात उतरले आहेत. 

बाजार समित्यांमध्ये गहू आणि बाजरीची आवकही घटली आहे. यावर्षी गव्हाचा पेराच कमी झाला असल्याने गव्हाला २९०० रुपये प्रतिक्विं टलचा भाव मिळत असला तरी गव्हाची आवक फारशी नाही. भविष्यात गव्हाचे भाव अधिक वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. लासलगाव बाजार समितीत सध्या जालना, राजस्थान या भागातील बाजरी येत आहे. मात्र या बाजरीचा जाहीर लिलाव न होता व्यापारी आपल्या वैयक्तिक संबंधांवर आणि गरजेप्रमाणे बाजरीच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार करत आहेत. मालेगाव बाजार समितीत सर्वच भुसार शेतमालाची आवक स्थिर असून, भावही स्थिर आहेत. मका भावात घट झाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. बाजरी तेजीत असून, आवक मात्र कमी झाली आहे. सोयाबीनसह इतर कडधान्याची आवक सर्वच बाजार समित्यांमध्ये कमी झाली आहे. सोयाबीनला ३२०० रुपये प्रतिक्विं टलपर्यंत भाव मिळत असून, कडधान्यांचे भावही टिकून आहेत. यावर्षी शेतकऱ्यांना उन्हाळ कांद्यानेही हात दिला नाही. लाल कांदाही ६००, ७०० च्या पुढे जाऊ शकला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. भुसार मालाचे भावही वाढले आहेत.

Web Title: Farmers Maize registration at Government purchase centers in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.