खरीप हंगाम नियोजनासाठी शेतकऱ्यांची लगबग
By admin | Published: May 29, 2016 11:17 PM2016-05-29T23:17:41+5:302016-05-29T23:18:14+5:30
बेलगाव कुऱ्हे : नांगर, वखर, सारायंत्र, तीपण, कोळप आदि औजारांची दुरुस्ती
बेलगाव कुऱ्ऱ्हे : भाताचे आगार समजल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुक्यात काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या खरीप हंगाम नियोजनासाठी जमीन मशागतीच्या तयारीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली असून शेतीसाठी लागणारी नांगर, वखर, सारायंत्र, तीपण, पाबर, कोळप आदि पारंपरिक औजारे कुशल कारागिरांकडून बनवली जात आहे. दुष्काळी परिस्थितीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या शेतकऱ्यांना अनेक कारणांनी पैशांची झळ बसत आहे.
काही दिवसात पावसाचे आगमन होण्याची चिन्हे असून ग्रामीण भागातील शेतकरी पारंपरिक औजारे कारागिरांकडून बनवून घेतात; मात्र महागाईमुळे औजारांनादेखील अडीच हजार रुपये खर्च येत असल्याने शेतकऱ्यांच्या खिशाला परवडणारे नसूनदेखील ते खरेदी करीत आहे. काळाच्या ओघात शेतकरी आधुनिक शेतीकडे वळला. ट्रॅक्टरच्या माध्यमातून मशागत करण्यासाठी अडीच ते तीन हजार रुपये भाव एकरला मोजावे लागत आहे. भाताचा तालुका म्हणून प्रसिद्ध असलेल्या तालुक्यातील शेकडो हेक्टर क्षेत्रावरील १३० गावे खरीप हंगामासाठी निश्चित केली असली तरी कागदी घोडे नाचविणाऱ्या अधिकाऱ्यांनी खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
तालुक्यातील महसुली गावांमध्ये अनेक शेतकरी पावसाळ्यात भात लागवड करतात. मेच्या शेवटच्या आठवड्यात खरीप हंगामाच्या जोरदार तयारीसाठी जमीन दुरुस्ती, मशागतीची कामे केली जातात; मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे व अवकाळीच्या माजवलेल्या कहरामुळे ग्रामीण भागातील काही शेतकऱ्याकडे जमीन दुरु स्ती, मशागतीसाठी पैसेच शिल्लक नसल्याने ते आता हवालदिल झाले आहेत. कर्जाच्या डोंगराची परतफेडदेखील होणे शक्य नाही. अशातच खरीपपूर्व मशागतीसाठी असणाऱ्या औजारांना बाजारात प्रचंड मागणी वाढली असून शासनाने शेतकऱ्याचे अश्रू पुसण्यासाठी तत्काळ योजनेची अंमलबजावणी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.
पावसाचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेल्या तालुक्यात अनियमित पावसामुळे गेल्या काही वर्षांपासून शेतीची अनेक कामे रखडली जात आहेत. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीव्यवसायावर अनेक विपरीत परिणाम होत आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना आपल्या शेतात भरपूर उत्पादन होण्यासाठी ते पूर्व मशागतीची नांगरट, मोघडणीची कामे सुरू करतात; मात्र शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडल्याने शेत मशागतीकडे दुर्लक्ष होत आहे.
गेल्या चार पाच वर्षात खरीप हंगामाच्या उत्पादनात मोठी घट झाल्याचे दिसून आले आहे. यावर्षी भयंकर दुष्काळी परिस्थिती आहे. उन्हाची तीव्रता अधिक असून शेतकऱ्याच्या हातात पैसाच नसल्याने ऐन वेळेला पाहू, निघेल काहीतरी मार्ग कदाचित असाच विचार तालुक्यातील शेतकरी करीत असावा असे चित्र पहावयास मिळत आहे.
तालुक्यातील दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत आहे. पिण्यासाठी पाणी आणि जनावरांसाठी चारा मिळावा यासाठी शेतकऱ्यांची भटकंती सुरू आहे. यंदा घेतलेली रब्बी पिके हाती लागली नसल्याने शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे.
खरीप पेरणीसाठी पैसाच उपलब्ध नसल्याने गरीब शेतकरी सैरभैर झाला आहे. दुष्काळी शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही अशी घोषणा शासनाकडून सातत्याने होत आहे. परंतु दुसरीकडे याच शासनाला रब्बी हंगामातील
बाधित शेतकऱ्यांना अनुदान उपलब्ध करून देण्याचा विसर पडला आहे. (वार्ताहर)