समृद्धीसाठी जमिनी संपादित करण्यास शेतकऱ्यांचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:19 AM2021-08-12T04:19:07+5:302021-08-12T04:19:07+5:30
नाशिक : जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाला जोडण्यात येणाऱ्या रस्त्यांसाठी इगतपुरी तालुक्यातील सात गावांमधील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. यापूर्वीही अनेक ...
नाशिक : जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाला जोडण्यात येणाऱ्या रस्त्यांसाठी इगतपुरी तालुक्यातील सात गावांमधील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. यापूर्वीही अनेक प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आलेल्या असतांना आता पुन्हा जमिनी संपादित करण्याची नोटीस आल्याने शेतकऱ्यांनी त्यास विरोध दर्शविली आहे.
याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून प्रसंगी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. इगतपुरी तालुक्यातील साकुर ते व्हीटीसी फाटा दरम्यान होणाऱ्या समृद्धी महामार्ग जोड रस्त्यासाठी शासनाने शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करणार असल्याची अधिसूचना १५ जून रोजी जारी केली आहे. नांदुरवैद्य, बेलगाव कुऱ्हे, गोंदे दुमाला, वाडिवऱ्हे, कुऱ्हेगाव, साकुर येथील जमीन समृद्धी महामार्ग जोड रस्त्यासाठी अधिग्रहित करण्याची सूचनेद्वारे सूचित करण्यात आलेले आहे. मात्र त्यास शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे.
इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी या यापूर्वीही अनेक प्रकल्पांसाठी घेण्यात आलेल्या आहेत. लष्कर, महामार्ग, धरणप्रकल्प, रेल्वेमार्ग, औद्योगिक क्षेत्र, फिल्मसिटी तसेच समृद्धी महामार्गासाठी जमिनी घेण्यात आलेल्या आहेत. आता समृद्धी जोड महामार्गास जमिनी संपादन करण्याचे सांगितले जात असल्याने त्यास शेतकऱ्यांचा विरोध असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
यासाठी जमिनी अधिग्रहित केल्यास आंदोलन छेडले जाईल असा इशारा सरोज काशिकर, अर्जुन बोराडे, शंकर ढिकले, शंकर पुरकर, बाळासाहेब धुमाळ, भानुदास ढिकले, किसन शिंदे, उत्तम सहाणे, यादवराव सहाणे, तुकाराम सहाणे, विनोद आवारी, शिवाजी पागेरे, सुभाष गायकर आदींनी निवेदनाद्वारे दिला आहे.
100821\10nsk_35_10082021_13.jpg
कॅप्शन: जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतांना शेतकरी संघटनेचे रामचंद्र बापू पाटील, सरोज काशीकर, अर्जून तात्या बोरेाडे, शंकरराव ढिकले, भानुदास ढिकले, किसन शिंदे,बाळासाहेब धुमाळ आदि.