संतापाच्या भरात शेतकऱ्यांनी टोमॅटो फेकला नाल्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 12:31 AM2018-11-25T00:31:06+5:302018-11-25T00:31:42+5:30
टोमॅटोची अचानक आवक वाढल्याने परिसरातील उत्पादक शेतकरी हवालदिल झाले असून, शनिवारी गिरणारे बाजारपेठेत शेतक-यांनी अक्षरश: व्यापा-यांची विनवणी करून खरेदी करण्याचा आग्रह धरला, परंतु मिळत असलेल्या अल्प भावामुळे काही शेतक-यांनी आपला माल घरी नेला तर काहींनी संतापाच्या भरात नाल्यामध्ये फेकून दिला.
मातोरी : टोमॅटोची अचानक आवक वाढल्याने परिसरातील उत्पादक शेतकरी हवालदिल झाले असून, शनिवारी गिरणारे बाजारपेठेत शेतक-यांनी अक्षरश: व्यापा-यांची विनवणी करून खरेदी करण्याचा आग्रह धरला, परंतु मिळत असलेल्या अल्प भावामुळे काही शेतक-यांनी आपला माल घरी नेला तर काहींनी संतापाच्या भरात नाल्यामध्ये फेकून दिला. गिरणारे येथील बाजारपेठ मातोरी व परिसरातील शेतकºयांना जवळची असल्याने शेतकरी आपल्या टोमॅटोेच्या जाळ्या बाजारपेठेत विक्रीसाठी घेऊन येतात. गेल्या अनेक दिवसांपासून टोमॅटोचे बाजारभाव पडले असून, शेतकरी आज ना उद्या बाजारभाव स्थिर होतील, या आशेवर होते. परंतु शनिवारी बाजारभावाने चांगलाच नीचांक गाठल्याने शेतकºयांच्या डोळ्यात पाणीच आणले. अवघ्या ३० व २० रुपये दराने व्यापाºयांनी टोमॅटो खरेदी करण्यास सुरुवात केली. टोमॅटो विक्रीच्या पैशातून गाडीभाडेदेखील सुटत नसल्याने संतापलेल्या शेतकºयांनी बाजारपेठेबाहेरील नाल्यातच माल फेकत घर गाठले, तर काही शेतकºयांनी माल विक्री न करता घरी घेऊन जाणे पसंत केले. प्रस्तृत प्रतिनिधीने काही शेतक-यांशी संवाद साधला असता त्यांच्या डोळ्यात अक्षरश: पाणी आले. शेतकºयांना वीज वितरणाचे बिले भरा नाही तर कनेक्शन कापण्याच्या नोटीसा, जिल्हा बॅँकेची धडक वसुली मोहीम व त्यातच टोमॅटोचे पडलेले भाव पाहता, शेतकरी संकटात सापडल्याचे त्यांनी सांगितले.
टोमॅटो लागवडीपासून आजपर्यंत दोन लाख खर्च झाला. परंतु आतापर्यंत फक्त दहा हजार कमवले. दिवसेंदिवस घसरणाºया दरामुळे पिकावर नागर फिरवायलाही हिम्मत होत नाही. कारण पोटच्या पोरा इतकाच पिकालाही जीव लावला आहे.
- सोमनाथ निंबेकर, शेतकरी, रवळगाव