महावितरणच्या आश्वासनानंतर शेतकरी पंचायतचे आंदोलन स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:19 AM2021-08-25T04:19:57+5:302021-08-25T04:19:57+5:30

येवला : शेती पंपांसाठी महावितरण कंपनीच्या २०२० च्या नव्या योजनेमध्ये बसवून येत्या महिनाभरात अतिभारित रोहित्र बसवून साताळीगाव परिसरातील ...

Farmers' panchayat agitation postponed after MSEDCL's assurance | महावितरणच्या आश्वासनानंतर शेतकरी पंचायतचे आंदोलन स्थगित

महावितरणच्या आश्वासनानंतर शेतकरी पंचायतचे आंदोलन स्थगित

Next

येवला : शेती पंपांसाठी महावितरण कंपनीच्या २०२० च्या नव्या योजनेमध्ये बसवून येत्या महिनाभरात अतिभारित रोहित्र बसवून साताळीगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्न कायमचा मार्गी लावणार असल्याचे ठोस आश्वासन महावितरण कंपनीचे येवला ग्रामीण विभागाचे उपकार्यकारी अभियंता आर. एम. पाटील यांनी दिल्याने शेतकरी पंचायतने आपले आंदोलन स्थगित केले आहे.

राष्ट्र सेवा दलप्रणीत शेतकरी पंचायतच्या साताळी येथील शेतकरी कार्यकर्त्यांनी उपकार्यकारी अभियंता पाटील यांना भेटून मागण्यांचे निवेदन दिले, समक्ष चर्चाही केली. त्यावेळी त्यांनी येथील वीजप्रश्न कायमचा सोडविण्याचे आश्वासन दिले. यावेळी शेतकऱ्यांनी शक्य तेवढ्या लवकर थकीत वीज बिल भरण्याचा शब्दही त्यांनी उपस्थितांकडून घेतला.

तालुक्यातील साताळी, चिचोंडी, भिंगारे, महालखेडा, नेऊरगाव, निमगाव मढ आदी गावांमध्ये महावितरणचा वीज पुरवठा अनियमित, कमी दाबाने आणि बेभरवशाचा होत असल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. अचानक रोहित्र जळण्याचे प्रकार वाढल्यामुळे पंधरा पंधरा दिवस वीजच नसल्याचा कटू अनुभव शेतकऱ्यांनी वर्षभरात अनेकदा घेतला. रोहित्र नव्याने बसवून वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी शेतकरी पंचायतीने आंदोलनाचा इशारा दिला होता.

साताळी गावातील दलित-आदिवासींनी मार्च महिन्यात जातीचे दाखले देऊनही चिचोंडीच्या वीज वितरण कार्यालयाचे सहायक अभियंता गिते यांनी वीज जोडणी मागणीकडे दुर्लक्ष केल्याबद्दल यावेळी तीव्र नाराजी व्यक्त केली गेली. पाटील यांनी सदर रोहित्र समाजकल्याण खात्याकडील विशेष अनुदानातून लवकरात लवकर बसवून देण्यासाठी पाठपुरावा करीत असल्याचे सांगून हेही काम मार्गी लावण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट केले.

याप्रसंगी राष्ट्र सेवा दलाचे राज्य कार्याध्यक्ष अर्जुन कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली साताळी ग्रामपंचायतीच्या सरपंच सुनंदा काळे, माजी सरपंच मच्छिंद्र काळे, चेअरमन भाऊसाहेब कोकाटे, दिलीप काळे, भिकाभाऊ सोनावणे, भाऊसाहेब जगताप, उपसरपंच गणेश कोकाटे, पी. के. काळे, सुखदेव काळे, कृष्णा कोकाटे, परशराम कोकाटे, संजय कोकाटे, दादाभाऊ सोनावणे, भाऊसाहेब काळे, अमोल सोनावणे, ज्ञानेश्वर मोरे, बबनराव कोकाटे, संजय सोनावणे, राजेंद्र कोकाटे, नितीन कोकाटे, बाळासाहेब कोकाटे, नारायण बारे, संदीप सोनावणे, साहेबराव कोकाटे आदी शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Farmers' panchayat agitation postponed after MSEDCL's assurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.