पावसाच्या भीतीने शेतकरी धास्तावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:24 AM2021-02-18T04:24:52+5:302021-02-18T04:24:52+5:30
शिवजयंतीमुळे शहर भगवेमय मालेगाव : छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शुक्रवारी साजरी होत आहे. या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी भगव्या कमानी उभारण्यात ...
शिवजयंतीमुळे शहर भगवेमय
मालेगाव : छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शुक्रवारी साजरी होत आहे. या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी भगव्या कमानी उभारण्यात आल्या आहेत. रस्त्याच्या दुतर्फा भगवे झेंडे लावण्यात आले आहेत. येथील अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मिरवणुकांना बंदी असल्यामुळे शिवप्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे. महाराजांची जयंती पारंपरिक पद्धतीने व कोरोनाच्या नियम व अटींचे पालन करून राहून साजरी करावी, असे आवाहन पोलीस, महसूल प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
ग्रामपंचायतींच्या कामकाजाला सुरुवात
मालेगाव : तालुक्यातील ९९ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. तसेच सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक गेल्या आठवड्यात पार पडल्याने गावांना कारभारी मिळाले आहेत. सरपंच, उपसरपंचांनी पदभार स्वीकारून प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून पदे रिक्त असल्यामुळे कामे खोळंबली होती. आता नव्या दमाच्या सदस्यांकडून कामकाजाला सुरुवात झाली आहे.
महाविद्यालय परिसर गजबजले
मालेगाव : आठ महिन्यांपासून शहरातील महाविद्यालये कोरोनामुळे बंद होती. राज्य शासनाने निर्बंध उठवून शाळा, महाविद्यालये सुरू केली आहेत. परिणामी महाविद्यालय परिसरात गजबज वाढली आहे. कॉलेजरोड परिसरात वर्दळ दिसून येत आहे. या भागातील व्यवसाय गेल्या काही दिवसांपासून ठप्प होता. आता महाविद्यालये सुरू झाल्याने शैक्षणिक वस्तूंसह इतर वस्तू विक्रीची दुकाने सुरू झाली आहेत.
चाळीसगाव फाट्यावर बसविले गतिरोधक
मालेगाव : मुंबई - आग्रा महामार्गावरील चाळीसगाव फाटा येथे आंदोलनानंतर गतिरोधक टाकण्यात आले आहेत. गेल्या आठवड्यात अपघात होऊन दोघा जणांचा बळी गेला होता. यानंतर माजी आमदार आसीफ शेख, आवामी पार्टीचे रिजवान बॅटरीवाला यांनी आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व टोल कंपनीला जाग आली आहे. या ठिकाणी गतिरोधक बसविण्यात आले आहेत.
पोलीस निरीक्षकाकडून नगरसेवकाला मारहाण
मालेगाव : भांडणात मध्यस्थी करण्यासाठी शहर पोलीस ठाण्यात गेलेल्या जनता दलाच्या नगरसेवकाला पोलीस निरीक्षकाने मारहाण केल्याची तक्रार पोलीस उपअधीक्षक लता दोंदे यांच्याकडे महागठबंधन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. या घटनेचा निषेध करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. एका रुग्णालयाच्या बिल कमी करण्याचा वाद मिटविण्यासाठी जनता दलाचे नगरसेवक तन्वीर जुल्फेखार रुग्णालयात गेले होते. यावेळी हा प्रकार घडला.
कब्रस्तानसाठी २ एकर जागा दान
मालेगाव : दरेगाव शिवारातील नागरिकांच्या सुविधेसाठी मोहंमद गुफरान मोहंमद उस्मान यांनी कब्रस्तानसाठी स्वमालकीची २ एकर जागा दान केली आहे. या ठिकाणी आवश्यक सुविधा पुरविण्याची मागणी महापौर ताहेरा शेख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. महापालिका हद्दीतील दरेगाव शिवारातील गट क्र. १४१/१ मधील ८१ आर इतकी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महापालिकेने या ठिकाणी संरक्षक भिंत, पथदीप, रस्ता, पाणी आदी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी मोहंमद गुफरान यांनी केली आहे.
पाझर तलाव दुरुस्तीसाठी ८५ लाख रुपये मंजूर
मालेगाव : तालुक्यातील वळवाडे शिवारातील पाझर तलाव गेल्या वर्षी अतिवृष्टीने फुटला होता. या पाझर तलावातून वळवाडे गावाला पिण्याचे पाणी व शेती सिंचनाला पाणी उपलब्ध होत असते; मात्र तलाव फुटल्याने नागरिकांना पाणी टंचाईची समस्या भेडसावण्याची भीती व्यक्त होत आहे. पाझर तलावाच्या दुरुस्तीसाठी शासनाने ८५ लाख रुपये मंजूर केले असल्याची माहिती कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली.