पाटणे परिसरातील शेतकरी उन्हाळ कांदा लागवडीत व्यस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 06:03 PM2020-12-29T18:03:41+5:302020-12-29T18:04:03+5:30
पाटणे: परिसरात उन्हाळ कांद्याची लागवड यावर्षी विक्रमी स्वरूपात होताना दिसून येत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी लागवडीत व्यस्त असल्याचे चित्र दिसून येत आहे.
अतिवृष्टीमुळे उन्हाळ कांद्याची रोपे खराब झाल्याने शेतक-यांनी पुन्हा बियाणे ३ ते ४ हजार रुपये किलो दराने खरेदी करून रोपे तयार केली. त्यामुळे एकाच वेळी सध्या कांद्याची लागवड सुरू आहे. यावर्षी मुबलक पावसामुळे सर्वत्र विहिरींना मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने तसेच मध्यंतरी कांद्याचे भाव वाढल्यामुळे कांदा पिकांच्या लागवड क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कांदा लागवडीसाठी मजुरी एकरी ७ ते ८ हजार रुपये किंवा अडीचशे ते तीनशे रुपये रोजाने मजूर वर्ग कांद्याची लागवड करताना दिसून येत आहेत. लागवडीचा वाढता खर्च, रोपांचा भाव, मजुरांची टंचाई, रासायनिक खतांचे वाढीव दर, भारनियमन अशा सर्व संकटांना सामोरे जाऊन बळीराजा कांदा लागवड करताना दिसत आहे.
खर्च वाढल्याने शेतकरी हतबल झाला आहे. कांदा लागवडीपूर्वीची मशागत ५ हजार रुपये, कांदा लागवड मजुरी ८ हजार रुपये, कांदा बियाणे व रोप लागवड करण्यायोग्य होईपर्यंत १० हजार रुपये खर्च, ३ हजार रुपये रासायनिक खते, ५ हजार रुपये शेणखत तसेच मजुरांची वाहतूक खर्च वेगळाच असतो. इतका खर्च करावा लागत असल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. शिवाय कांद्याचे उत्पादन चांगले मिळेलच याची शाश्वती नाही. उन्हाळ कांद्याची विक्रमी लागवड सुरू असतानाच शेतकऱ्यांना अधिक प्रमाणात खर्च करावा लागत आहे. तसेच मजुरांची टंचाई, वाढती मजुरी, रोपांचा तुटवडा, भारनियमनाचा फटका, वाढती थंडी या सर्व समस्यांना सामोरे जाण्याची वेळ बळीराजावर येऊन ठेपली आहे.