खासगी कंपन्यांच्या बियाण्यांना शेतकऱ्यांची पसंती ; महाबीज, एनएससी पुरवठा, विक्रीत पिछाडीवर
By नामदेव भोर | Published: June 26, 2020 05:47 PM2020-06-26T17:47:25+5:302020-06-26T17:51:45+5:30
महाबीजच्या बियाण्यांच्या उगवण क्षमतेच्या बाबतीत वारंवार तक्रारी असल्याने दिवसेंदिवस शेतकऱ्यांचा कल खासगी कंपन्यांचे बियाणे खरेदीकडे वाढत आहे. त्यामुळे खरिपाच्या पार्श्वभूमीवर एकूण ७१ हजार १७७ क्विंटल बियाण्यांची विक्री झाली असून, यात सर्वाधिक विक्री खासगी कंपन्यांच्या बियाण्यांची झाली आहे.
नामदेव भोर/नाशिक: जिल्ह्यात खरिपाच्या पार्श्वभूमीवर एकूण ७१ हजार १७७ क्विंटल बियाण्यांची विक्री झाली असून, यात सर्वाधिक विक्री खासगी कंपन्यांच्या बियाण्यांची झाली असून, महाबीज व एनएससीच्या बियाण्यांपेक्षा शेतकऱ्यांनी खासगी कंपन्यांच्या बियाण्यांनाच अधिक पसंती दिल्याचे दिसून येत आहे. महाबीजच्या बियाण्यांच्या उगवण क्षमतेच्या बाबतीत वारंवार तक्रारी असल्याने दिवसेंदिवस शेतकऱ्यांचा कल खासगी कंपन्यांचे बियाणे खरेदीकडे वाढत असताना महाबीज व राष्ट्रीय बियाणे महामंडळ शेतकऱ्यांच्या आवश्यक तेनुसार दर्जेदार व गुणवत्तापूर्ण बियाणे पुरविण्यास कमी पडत असल्याचे दिसून येत आहे.
नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९७ हजार १०२ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा झाला असून, त्यापैकी ७१ हजार १७७ क्विंटल बियाण्यांची विक्री झाली आहे. परंतु यात ५८ हजार २२४ क्विंटल एवढा सर्वाधिक वाटा खासगी कंपन्यांचा आहे, तर महाबिज केवळ नऊ हजार १८१ व एनएससीच्या तीन हजार ७१० क्विंटल बियाण्यांची विक्री झाली आहे. तुलनेत खासगी कंपन्यांनी बाजारात तब्बल ८१ हजार ९१२ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा केला होता, तर महाबिजने ९ हजार ६९० व एनएससीने ५ हजार ५०० असा एकूण १५ हजार १९० क्विंटल बियाणे पुरवठा केला होेता. म्हणजे खासगी कंपन्यांनी महाबीज अणि एनएससीपेक्षा सुमारे ५.३९ पटीने अधिक पुरवठा करून जवळपास ४.५१ पटीने अधिक विक्री केली आहे.
नाशिक जिल्ह्यात प्रामुख्याने सोयाबीन, भात, ज्वारी, बाजरी, मका, नागली, तूर, उडीद, भुईमूग व कापूस यासारखी खरीप पिके घेतली जातात. त्यासाठी जिल्ह्यात महाबीजचे ९ हजार ६९० क्विंटल, राष्ट्रीय बियाणे महामंडळ (एनएससी) ५ हजार ५ क्विंटल व खासगी कंपन्यांकडून ८१ हजार ९१२ क्विंटल असा एकूण ९७ हजार १०२ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा करण्यात आला होता. त्यापैकी सुमारे ३१ हजार १५२ क्विंटल बियाणे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचविण्यात आले आहेत. परंतु, या योजनेचा लाभ केवळ १९४८ गावांमधील ७ हजार ४९५ गटांना मिळाला असून, गटापासून दूर राहिलेले एकल शेतकरी मात्र थेट बांधावर खते आणि बियाणे योजनेपासून वंचित राहिले आहेत.