खरीपाच्या पेरणीसाठी शेतकरी सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 04:35 PM2019-06-12T16:35:32+5:302019-06-12T16:35:46+5:30
नजरा आभाळाकडे : मृग नक्षत्राचे पहिले चरण कोरडे
खामखेडा - मृग नक्षत्राचे पहिले चरण उलटले तरी अद्याप पावसाचा मागमूस दिसून येत नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. दरम्यान, देवळा तालुका परिसरातील शेतकरी शेती मशागतीची कामे पूर्ण करून पेरणीसाठी सज्ज झाला असून त्याच्या आभाळाकडे नजरा लागल्या आहेत.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी खरीप पिकाच्या मशागतीची कामे पूर्ण केली आहेत.जमिनीची नांगरणी ,वखरणी, जमिनीत शेणखत मिळवणे आदि कामे पूर्ण झाली असून शेतकरी पेरणीसाठी सज्ज झाला आहे. मात्र, रोहिणी नक्षत्र कोरडे गेल्यानंतर मृग नक्षत्राचे आगमन दमदार होईल, अशी अपेक्षा शेतक-यांना होती. परंतु, मृगाचे पहिले चरण उलटूनही अद्याप पावसाची चिन्हे दिसत नसल्याने शेतक-यांच्या चिंता वाढल्या आहेत. आकाशात ढगांची गर्दी होते परंतु, समाधानकारक पाऊस पडत नसल्याने निराशा होत आहे. पेरणीच्या दृष्टीने शेतक-यांची मृग नक्षत्रावर मोठी भिस्त असते. येत्या तीन-चार दिवसामघ्ये पाऊस झाला नाही आणि मृग नक्षत्र उशिराने बरसले तर खरीपाची पेरणी कशी करावी, हा प्रश्न उभा राहणार आहे. दर वर्षी खरीपाची पेरणी लवकर झाली तर रब्बी हंगामातील पिकांची लागवड लवकर करता येते. गेल्या चार -पाच वर्षापासून चागला पाऊस होत नसल्याने पुढे उन्हाळ्यात विहिरींना पाणी राहात नाही . त्यामुळे उन्हाळ्यात हाती आलेले पिके पाण्याअभावी सोडावी लागतात. यंदा शेतक-यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. जोरदार पाऊस पडावा म्हणून देवाची प्रार्थना केली जात आहे. पारावरही पावसाच्याच गप्पा झडत आहेत.
विक्रेत्यांकडून कोंडी
बी-बियाणे विक्रेत्यांनी यंदा उधारीवर बीयाणे देण्यास नकार दर्शविल्याने शेतकºयांची मोठी कोंडी झाली आहे. हा प्रश्न कसा सोडवायचा ही विवंचनाही आहे. हात उसनवार करुन बि-बियाणे आणली तरी ती योग्यवेळी उपयोगात आली नाही तर आर्थिक संकटाला सामोरे जावे लागण्याची भीती व्यक्त होत आहे.