जागा देण्यास शेतकऱ्यांचा नकारच
By admin | Published: October 28, 2015 11:34 PM2015-10-28T23:34:16+5:302015-10-28T23:34:43+5:30
शासन निर्णयास विरोध : आधी जमिनीचे मूल्यांकन वाढविण्याची मागणी
नाशिक : साधुग्रामसाठी लागणारी जागा शेतकऱ्यांनी कोणत्याही आर्थिक मोबदल्याशिवाय त्वरित द्यावी, यासाठी शासनाने बोनस टीडीआर देण्याचा घेतलेला निर्णय शेतकऱ्यांच्या पचनी पडलेला नाही. मुळात शेती क्षेत्राचा टीडीआर असल्याने त्याचे मूल्यांकन कमी आहे, त्यातच ३ कोटी चौरस फुटाचा टीडीआर मिळणार म्हणून भाव कोसळले तर शेतकऱ्यांच्या टीडीआर पडत्या दरानेच खरेदी करावे लागणार असल्याने शेतकऱ्यांनी या निर्णयास स्वच्छ शब्दात नकार दिला आहे. या जागांचे मूल्यांकन (रेडीरेकनर) जानेवारी महिन्यात आणि तेही रहिवासी क्षेत्रानुसार वाढणार असेल, तरच जमीन देऊ, असे शेतकऱ्यांनी स्पष्ट केल्याने साधुग्रामचा तिढा ‘जैसे थे’ राहण्याची शक्यता आहे.
साधुग्रामसाठी शासनाने सव्वा तीनशे एकर क्षेत्र राखीव ठेवले असून, त्यापैकी ५४ एकर जागा पालिकेच्या ताब्यात आहे. उर्वरित जागेसाठी शासनाने बोनस टीडीआर देण्याची तयारी दर्शविली होती तसा प्रस्ताव महापालिकेकडे मागितला होता. महापालिकेने एकास सहा म्हणजे सहापट टीडीआर देण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला असला तरी शासनाने एकास अडीच म्हणजेच अडीचपट टीडीआर मंजूर केला आहे.
मुख्यमंत्र्यांना साकडे
तपोवनात शेती क्षेत्राचे मूल्यांकन वाढावे यासाठी एका स्थानिक आमदाराच्या माध्यमातून शेतकर्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री एकनाथ खडसे यांची भेट घेतली. त्यांनी मूल्यांकन वाढविण्यासाठी अधिकार्यांना भेट घेण्यास सांगितले. अद्याप हा निर्णय झालेला नाही. मात्र, १ जानेवारीपासून मूल्यांकन वाढेल, असे त्यांनी सांगितले. सध्या तपोवनात शेतीचे दर २२00 रुपये चौरस फूट, तर लगतच्या रहिवासी क्षेत्रात १४ हजार रुपये मीटर जमिनीचे भाव असल्याचे जाणकारांनी सांगितले.