शेतकरी रस्त्यावर
By admin | Published: June 5, 2017 12:42 AM2017-06-05T00:42:43+5:302017-06-05T00:42:51+5:30
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू ठेवण्याबरोबरच ते अधिक तीव्र करीत भाजपाचा निषेध नोंदविला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू ठेवण्याबरोबरच ते अधिक तीव्र करीत भाजपाचा निषेध नोंदविला. रविवारी सकाळी म्हसरूळ येथे परिसरातील शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत रस्त्यावर भाजीपाला फेकून दिला. यावेळी पोलिसांनी काही कार्यकर्त्यांची धरपडक केली. या आंदोलनामुळे या मार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली होती. सुमारे अर्धातास गोंधळ सुरू होता. भाजीपाला रस्त्यावर टाकून म्हसरूळला रास्ता रोको
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : संपूर्ण कर्जमाफी, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी तसेच शेतमालाच्या हमीभावासाठी राज्यातील शेतकऱ्यांनी संपाचे हत्त्यार उपसले आहे़ रविवारी (दि़४) या संपाच्या चौथ्या दिवशी म्हसरूळमधील शेतकऱ्यांनी एकत्र येत गावाजवळील चौफुलीवर शेतातील भोपळे, कांदे व दूध रस्त्यावर ओतून देत रास्ता रोको आंदोलन केले़ पोलिसांनी २० आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
संपूर्ण कर्जमाफी, हमीभाव यासाठी राज्यभरात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे़ रविवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास म्हसरूळमधील शेतकरी मोठ्या संख्येने चौफुलीवर जमा झाले़ यातील काही शेतकऱ्यांनी आपल्या ट्रॅक्टरमध्ये शेतातील भोपळे, कांदे आणून रस्त्यावर टाकून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली़ तर शिवारातील दूध उत्पादकांनीही दूध रस्त्यावर ओतून आंदोलनात सहभाग घेतला होता़
म्हसरूळला शेतकऱ्यांनी अचानक केलेल्या या आंदोलनाचा पोलिसांना थांगपत्ताच नव्हता़ शेतकऱ्यांनी रस्त्यावर शेतमाल आणून टाकल्यानंतर तेथील पोलीस चौकीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने आंदोलनाची माहिती दिल्यानंतर पोलिसांचा ताफा म्हसरूळकडे रवाना झाला़ मात्र, तोपर्यंत वाहतुकीची बरीच कोंडी झालेली होती़ यानंतर घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी वाहतूक सुरळीत करून सुमारे २० आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले़
पोलिसांनी बाळासाहेब उखाडे, विलास जाधव, अनिकेत महाले, सुधाकर मोराडे, कैलास शिंदे, निखिल मोराडे, हर्षल पवार, अमोल जाधव, संतोष भवर, गोकुळ गोहाड, राकेश मोराडे, गौरव शिरसाठ, सागर जाधव, सुभाष जाधव, सतीश मोराडे, योगेश जाधव, सुनील गुंजाळ, सचिन जाधव, रवींद्र मोराडे, बाळासाहेब शिरसाठ या आंदोलनकर्ते शेतकऱ्यांना ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे़ या सर्वांना सोमवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे़