निगेटिव्ह वाहनचालकांसाठी शेतकऱ्यांची धावाधाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:14 AM2021-05-24T04:14:46+5:302021-05-24T04:14:46+5:30
शेतकऱ्यांना मुख्य प्रवेशद्वारावरून यार्ड आवारात प्रवेश करताना सोबत किमान सात दिवस अगोदर केलेला कोरोना चाचणी निगेटिव्ह अहवाल असणे ...
शेतकऱ्यांना मुख्य प्रवेशद्वारावरून यार्ड आवारात प्रवेश करताना सोबत किमान सात दिवस अगोदर केलेला कोरोना चाचणी निगेटिव्ह अहवाल असणे बंधनकारक केले आहे. कोरोना चाचणी अहवाल नसल्यास संबंधित व्यक्तींना आवारात प्रवेश दिला जाणार नसल्याने शेतकऱ्यांची पंचायत झाली आहे. थोड्याच दिवसांवर येऊन ठेपलेल्या खरीप हंगामासाठी तसेच बी-बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना कोरोना चाचणीचा निगेटिव्ह अहवाल आल्याशिवाय कांदा विक्री करता येणार नाही. कांदा उत्पादक शेतकरी कांदा विक्रीसाठी भाड्याने वाहन आणतात. लिलावप्रसंगी पडलेले कांदे भरण्यासाठी दोन माणसांची आवश्यकता असल्याने अनेकवेळा कांदा मालक हा वाहनासोबत येत असतो. पण कोरोना चाचणी निगेटिव्ह अहवालाची सक्ती केल्याने तसेच वाहनाबरोबर एकच व्यक्ती बंधनकारक केल्याने वाहनचालकच कांदा मालक होणार आहे.
इन्फो
प्रहारचे ई-मेल आंदोलन
बाजार समित्यांच्या जाचक अटी रद्द करण्यासाठी प्रहार संघटनेने ई-मेल आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा उपनिबंधक यांच्या ई-मेलवर कोरोनाच्या टेस्टची जाचक अट रद्द करणेबाबत ई-मेल आंदोलन केले जाणार आहे. प्रहारचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ महाजन यांनी याबाबत शेतकऱ्यांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
कोट....
बाजार समितीने ५०० वाहनांची मर्यादा वाढवावी. येवला, लासलगाव, पिंपळगाव बसवंत, उमराणे या बाजार समितीमध्ये व्यापारी संख्या जास्त असल्याने सदर माल व्यापाऱ्यांना पुरणार नसल्याने एक हजार ट्रॅक्टरची नोंदणी करण्यात यावी.
- मल्हारी दराडे, कांदा उत्पादक शेतकरी
कोट...
बाजार समितीत प्रवेशासाठी शेतकऱ्यांना आरटीपीसीआर टेस्ट आवश्यक असल्याचे सांगितले आहे. शेतकरी घाईघाईने आपला शेतीमाल बाजारात आणत असतो. आरटीपीसीआर टेस्टचा रिपोर्ट दोन - तीन दिवसांनी येतो. तोपर्यंत शेतकरी कसा थांबेल. या निर्णयाचा फेरविचार होणे गरजेचे आहे.
- कुबेर जाधव, शेतकरी