शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविला ‘मुळा’
By admin | Published: June 23, 2017 12:38 AM2017-06-23T00:38:29+5:302017-06-23T00:38:46+5:30
मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीला अनेक निकष लावत शेतकऱ्यांना गाजर दाखविल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना कुरियरने मुळा पाठवून रोष व्यक्त केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सातपूर : सरसकट कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी असताना मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीला अनेक निकष लावत शेतकऱ्यांना गाजर दाखविल्याचा आरोप करीत नाशिक तालुक्यातील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना कुरियरने मुळा पाठवून रोष व्यक्त केला आहे.
सरसकट कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करावा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी मान्य कराव्यात या मागणीसाठी राज्यातील शेतकऱ्यांनी १ जूनपासून आंदोलन पुकारले होते. दरम्यान, या मागणीची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी सुकाणू समितीबरोबर चर्चा करून कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले होते. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीचे निकष बदलल्याने शेतकरी पुन्हा संतप्त झाल्याने ठिकठिकाणी शेतकरी शासन निर्णयाची होळी करीत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना गाजर दाखविले, अशी भावना शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर तालुक्यातील शेतकऱ्यांनी दुपारी ४ वाजेच्या सुमारास कुरियरने मुख्यमंत्र्यांच्या मुंबईतील वर्षा बंगल्यावर मुळा पेटी पाठवून मुख्यमंत्र्यांच्या विरोधातील राग व्यक्त केला आहे. यावेळी सुकाणू समिती सदस्य कैलास खांडबहाले, राजू खांडबहाले, अशोक खांडबहाले, बापू खांडबहाले, अर्जुन खांडबहाले, सचिन खांडबहाले, गोरख गवळी, तुकाराम कापसे, मोतीराम गोराळे, भाऊसाहेब मोरे आदिंसह माहिरावणी, खंबाळे, तळेगाव, गिरणारे, गणेशगाव येथील शेतकरी उपस्थित होते.