शेतकऱ्यांची जुनी कर्जे गोठवून नवीन कर्र्ज द्यावीत
By admin | Published: May 15, 2016 10:16 PM2016-05-15T22:16:12+5:302016-05-15T22:36:09+5:30
सदाभाऊ खोत : दुष्काळग्रस्तांशी साधला संवाद
पांगरी : सिन्नर तालुक्यातल्या पांगरी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी भेट देऊन दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांची जूनी कर्जे गोठवून त्यांना नवीन कर्ज द्यावे व पाच वर्षांनी समान हप्त्यांत कर्जाची वसुली करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
सोलापूरहून नाशिक येथे जात असताना खोत यांनी पांगरी येथे धावती भेट दिली. येथील साईबाबा मंदिराजवळ बैठक घेऊन त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. शंभर टक्के कर्जमाफी आणि कांदा व दुधाला हमीभाव या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनाचाही त्यांनी यावेळी आढावा घेतला. शंभर टक्के कर्जमाफी नाही मिळाली तरी किमान दहा वर्षे बिगर व्याजी कर्ज मिळाले तरी शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे ते म्हणाले. विजय मल्ल्यांसारखे उद्योगपती कर्ज घेऊन सहजपणे देश सोडतात. मात्र, शेतकऱ्यांना कर्जासाठी थेट जग सोडण्याची दुर्दैवी वेळ येत असल्याचे खोत म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांनीही शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बी-बियाणे, शेतीची अवजारे, बैल सरकारी खजिन्यातून दिली होती. त्यामुळेच स्वराज्य भक्कमपणे उभे राहिले. शिवरायांनी शेतकऱ्यांनाच केंद्रबिंदू मानले होते. आत्ताच्या राज्यकर्त्यांनीही त्याच पद्धतीचा अवलंब करण्याची आवश्यकता असल्याचे खोत म्हणाले.
दुधाच्या उत्पादनात ५० टक्के भेसळ होत असल्यानेच भावात घसरण झाल्याचे त्यांनी सांगितले. सरकारने भेसळखोरांना लगाम घातल्यास भाव वाढणार असल्याचे ते म्हणाले. याशिवाय दुधाचा दर्जा तयार करून बाजारातील इतर उत्पादनांशी स्पर्धा करावी लागणार असल्याचे खोत यांनी सांगितले. शांताराम पगार, संजय वारुळे यांच्या हस्ते खोत यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी रवि पगार, सरपंच ज्ञानेश्वर पांगारकर, आत्माराम पगार, विश्वनाथ पगार, कृष्णा घुमरे, सोमनाथ पगार, संदीप शिंदे, सुभाष पगार, धनंजय निरगुडे, नीलेश पगार, बाजीराव कांडेकर, संजय पगार, रभाजी पगार, प्रदीप तनपुरे आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)