शेतकऱ्यांनो पेरणीची घाई नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:18 AM2021-06-09T04:18:39+5:302021-06-09T04:18:39+5:30
चौकट- पावती, बॅग जपून ठेवा खरीप हंगामात बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्राकडून पक्के बिल घ्यावे. पेरणी केल्यानंतर ...
चौकट-
पावती, बॅग जपून ठेवा
खरीप हंगामात बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्राकडून पक्के बिल घ्यावे. पेरणी केल्यानंतर बियाणांची बॅग, पावती आणि लेबल जपून ठेवावे, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. जर बियाणे बोगस निघाले तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यात अनेक अडचणी येतात. गतवर्षी अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीनचे बियाणे बोगस निघाले होते. अनेकांना दुबार पेरणीचा खर्च करावा लागला होता. यासाठी या गोष्टी आवश्यक असल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे.
चौकट-
सोयाबीन पेरताना घ्या काळजी
गतवर्षीचा अनुभव पाहता शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरताना विशेष काळजी घ्यावी. पेरणीपूर्वी बियाणांची उगवण क्षमता तपासावी. किमान ८० टक्के ओल असेल तरच पेरणी करावी. पेरताना बी अधिक खोल जाणार नाही याची काळजी घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे. गतवर्षीच्या हंगामात उत्पादन कमी झाल्यामुळे सोयाबीनचे भाव कडाडले होते. ते यापुढेही कायम राहतील, असा अंदाज बांधणे धाडसाचे होऊ शकते. सोयाबीनचे येणारे उत्पादन आणि त्याला मिळणारा भाव व होणारा खर्च याचा ताळमेळ बसत असेल तरच शेतकऱ्यांनी धाडस करणे योग्य राहील, असेही कृषी अभ्यासक सांगतात.
कोट-
मान्सूनपूर्व पाऊस जिल्ह्यातील सर्व भागांत पडलेला नाही. काही ठिकाणी तो अधिक झाला असला तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. अजून जमिनीतील उष्णता कमी झालेली नाही. या पावसामुळे उगवणारे गवत उगवू द्यावे. त्यानंतर कोळपणी करून पेरणी केली तर पुढे होणारा तणनाशकाचा खर्च कमी होईल. आपल्याकडे रायझेरीयम स्फुरद विरघळवणारे जीवाणू उपलब्ध आहेत. सोयाबीन बियाणांवर याची बीज प्रक्रिया केली, तर रासायनिक खतांचा खर्च कमी करण्याबरोबरच उत्पादनातही भर पडू शकते.
- डॉ. भानुदास गमे, कृषी शास्त्रज्ञ, निफाड