शेतकऱ्याने स्वयंस्फूर्तीने बुजविली धोकादायक विहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 01:00 PM2020-02-06T13:00:26+5:302020-02-06T13:00:34+5:30
देवळा : वाखारी येथील एका शेतक-याने रस्त्याकडेला असलेली धोकादायक विहीर स्वखर्चाने बुजवून टाकत समाजापुढे आदर्श ठेवला आहे. मालेगाव-देवळा रस्त्यावरील ...
देवळा : वाखारी येथील एका शेतक-याने रस्त्याकडेला असलेली धोकादायक विहीर स्वखर्चाने बुजवून टाकत समाजापुढे आदर्श ठेवला आहे. मालेगाव-देवळा रस्त्यावरील मेशी फाट्यावर आठवडाभरापूर्वी रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत बस व रिक्षा कोसळून झालेल्या अपघातात २६ जण मृत्युमुखी पडले होते. त्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या धोकादायक विहिरींचा प्रश्न ऐरणीवर आला होता.
देवळा तालुक्यात रस्त्याकडेला असलेल्या अनेक धोकादायक व पडिक विहीरी आहेत. मेशी येथे झालेल्या अपघातामुळे या विहीरी चर्चेत आल्या.तोपर्यंत रस्त्याकडेला असलेल्या अशा धोकादायक विहिरींचा प्रश्न कुणी फारसा गांभीर्याने घेतला नव्हता. तालुक्यातील प्रत्येक गावात असलेल्या अशा धोकादायक विहिरींची चर्चा आता नागरिकांमध्ये सुरू झाली असून या विहीरींसाठी संरक्षणात्मक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे. गावातील अशा विहिरींपैकी काही विहिरी या वापरात आहेत, परंतु या विहिरींना संरक्षक कठडे, अथवा कुंपण घालून सुरक्षात्मक व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे. तसेच ६० ते ६० वर्षापूर्वीच्या पडीक अवस्थेत असलेल्या अनेक धोकादायक विहीरी सद्या वापरात नाहीत. या पडीक विहीरी बुजवून टाकण्याची गरज आहे. परंतु यासाठी पुढाकार कोणी घ्यायचा? कारण हया जुन्या विहीरींवर परंपरेने वारसदारांची संख्या वाढत गेल्यामुळे सातबारा उतार्यावर अनेक वारसदारांचा मालकी हक्क तयार झाला. अनेक ठिकाणी त्यांचे आपआपसातील वादांमुळे एकमत होत नसल्यामुळे या सामायिक पडीक विहीरींचा प्रश्न मार्गी लागू शकला नाही. यासाठी गावातीत ग्रामस्थांनी पुढाकार घेतला तर हा प्रश्न मार्गी लागणे सहज शक्य असल्याचे वाखारी येथील ग्रामस्थांनी दाखवून दिले आहे.
देवळा वाखारी रस्त्यावर रस्त्याच्या कडेला असलेली सामायिक वापरातील विहीर मेशी येथील अपघाताच्या घटनेनंतर विहिर मालक तानाजी खंडू आहेर, भास्कर अंबू आहेर, अर्जून अंबू आहेर यांनी आपली वापरातील विहीर जेसीबीच्या सहाय्याने बुजवून टाकली. त्यांच्या या निर्णयाचे सरपंच राहुल पवार, उपसरपंच डॉ. संजय सिरसाठ, ग्रामपंचायत सदस्य, व ग्रामस्थांनी स्वागत केले आहे.
-----------------------
रस्त्याच्या कडेला आमची वडिलोपार्जीत जुनी सामायिक विहीर होती.विहीरीवर बसविलेल्या वीजपंपाच्या सहाय्याने शेतातील पीकांना पाणी देत होतो. विहीर धोकादायक आहे हे दिसत होते, परंतु या शेतीच्या गटात एवढी एकच विहीर असल्यामुळे आमचाही नाईलाज झाला होता. परंतु मेशी येथे झालेल्या बस अपघातानंतर आम्ही सर्व भावांनी एकत्र येउन चर्चा केली व विहीर बुजवून टाकण्याचा निर्णय घेतला.
- तानाजी आहेर ( विहीर मालक, वाखारी )
------------------
देवळा वाखारी रस्त्यावर रस्त्याच्या कडेला असलेली ही धोकादायक विहीर बुजून टाका, अथवा तिला संरक्षणात्मक कठडे बांधा अशी सूचना ग्रामपंचायतीमार्फत संबंधित शेतकऱ्यांना दोन वर्षापूर्वी दिली होती. विहीरीला पाणी होते व ती वापरात असल्यामुळे फारसे गांभीर्याने घेतले नाही. परंतु मेशी येथील बस अपघाताच्या घटनेनंतर सदर शेतकºयांनी स्वयंस्फूूर्तीने विहीर बुजून टाकली. ग्रामपंचायतीने गावातील काही धोकादायक असलेल्या विहीरी बाबत योग्य त्या उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे.
-डॉ. संजय सिरसाठ ( उपसरपंच, वाखारी )