शेतकऱ्यांचा महावितरणपुढे ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:39 AM2021-02-20T04:39:45+5:302021-02-20T04:39:45+5:30
वीज वितरण कंपनीकडून मागील काही दिवसांपासून कळवण तालुक्यात कृषिपंप आणि गावांना सुरळीत वीजपुरवठा मिळत नसून वारंवार वीज पुरवठा खंडित ...
वीज वितरण कंपनीकडून मागील काही दिवसांपासून कळवण तालुक्यात कृषिपंप आणि गावांना सुरळीत वीजपुरवठा मिळत नसून वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे पिकांना पाणी कसे द्यावे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे. त्यामुळे कनाशी पश्चिम पट्ट्यातील संतप्त शेतकऱ्यांनी कळवण पंचायत समितीचे उपसभापती विजय शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली कळवणच्या महावितरण कार्यालयासमोर तासभर ठिय्या मांडून वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली.
दरम्यान आमदार नितीन पवार यांनी पिंपळे खुर्द येथे नव्याने उभारलेले वीज उपकेंद्र तात्काळ सुरु करुन तेथून शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा उपलब्ध करुन द्या, अशा सूचना महावितरणच्या यंत्रणेला केल्यानंतर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले.
कळवण तालुक्यातील कृषी पंपाची वीजेची मागणी वाढली असल्यामुळे तालुक्यात ठिकठिकाणी वारंवार वीज पुरवठा खंडीत होत आहे. त्यामुळे पिकांना पाणी देणे अवघड होऊन बसले आहे. कळवण तालुक्यात पाण्याअभावी पिके वाळण्याची भिती आहे. शेतकरी महावितरणचे वेळेवर वीज बिल भरत असून सुरळीत व अखंड वीज पुरवठा मिळत नसल्याने महावितरण विरोधात शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात रोष आहे.
इन्फो
उपाययोजनांची मागणी
सध्या रब्बीचा हंगाम सुरु असून शेतात पीक उभे आहे . वीज पुरवठा सुरळीत मिळत नसल्यामुळे पाण्याअभावी पिके हातातून जाण्याची भिती निर्माण झाली आहे . या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा उपलब्ध करुन द्यावा आणि वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी महावितरणने उपाययोजना करावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. नव्याने कार्यन्वित करण्यात येणाऱ्या पिंपळे खुर्द वीज उपकेंद्रातून वीज पुरवठा कार्यन्वित केल्यास अन्य भागातील वीजेचा दाब कमी होण्यास मदत होऊन तालुक्यात वीज पुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
फोटो- १८ कळवण आंदोलन
सुरळीत वीजपुरवठ्यासाठी कळवण येथील महावितरणच्या कार्यालयासमोर ठिय्या मांडलेले शेतकरी.
===Photopath===
180221\18nsk_46_18022021_13.jpg
===Caption===
फोटो- १८ कळवण आंदोलनसुरळीत वीजपुरवठ्यासाठी कळवण येथील महावितरणच्या कार्यालयासमोर ठिय्या मांडलेले शेतकरी.