टरबूज-खरबूज घेऊन शेतकरी रस्त्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:14 AM2021-05-22T04:14:33+5:302021-05-22T04:14:33+5:30
चांदोरी : कोरोनाचा परिणाम मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागावरही होऊ लागला आहे. निर्बंधांमुळे बाजार समित्या बंद आहेत. त्यामुळे शेतमालाचे ...
चांदोरी : कोरोनाचा परिणाम मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागावरही होऊ लागला आहे. निर्बंधांमुळे बाजार समित्या बंद आहेत. त्यामुळे शेतमालाचे नुकसान होत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या टरबुज, खरबुज, भाजीपाल्याच्या इतर वाणांना व्यापारी प्रतिसाद देत नसल्याने शेतकऱ्यांना आपला माल रस्त्यावर थांबून विक्री करावा लागत असल्याचे चित्र शहरासह ग्रामीण भागात दिसून येत आहे.
सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाचा परिणाम जाणवत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. शेतकऱ्यांच्या खरबुज, टरबुज पिकाला भाव मिळत नसून व्यापारी फिरकत नसल्याचे चित्र आहे. एखाद्या वेळेस व्यापारी आले तरी खूपच कमी भावाने टरबुजाची मागणी करीत आहेत. जानेवारी महिन्यात लागवडीच्या वेळी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्यामुळे या पिकाला चांगला नफा मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, फळ तोडणीच्या वेळेस कोरोनाची दुसरी लाट आल्याने शासनाला गतवर्षीप्रमाणे कडक निर्बंध लावावे लागले. अनेक ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली. तालुक्यातील तसेच शेजारी तालुक्यातील टरबुज उत्पादक शेतकऱ्यांना व्यापारी भेटत नसल्याने लागवडीसाठी केलेला खर्च काढण्यासाठी या शेतकऱ्यांना आपला
माल रस्त्यावर बसून विक्री करावा लागत आहे. रस्त्यावर दुकाने लावल्यानंतरही टरबुज खरेदीसाठी ग्राहकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने टरबुज खराब होत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.
इन्फो
कमी दराने मागणी
अधिक टंचाईच्या काळात शेतकऱ्यांनी उधार उसनवारीने पैसे गोळा करून मोठ्या आशेने टरबुजाची लागवड केली. शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने मल्चिंग पेपर तसेच दर्जेदार बियाण्याची लागवड करून ठिबक सिंचनाद्वारे पिकांची जोपासना केली. यासाठी एकरी ५० ते ६० हजार रुपये खर्च आला आहे. शेतमाल खरेदीसाठी क्वचित व्यापारी येत असून तेही कमी भावाने मागणी करत आहेत. माल खरेदीसाठी व्यापारी येत नसल्याने टरबुज विक्री करताना मोठी अडचण निर्माण झाली आहे. लावलेले भांडवलही निघत नसल्याचे चित्र आहे. यामुळे या शेतकऱ्यांवर पुन्हा कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे.
फोटो - २१ टरबुज