वाकीखापरीजवळ शेतकऱ्यांचा ठिय्या
By admin | Published: January 28, 2017 12:32 AM2017-01-28T00:32:46+5:302017-01-28T00:32:57+5:30
घोटी : अखेर विसर्ग बंद; अधिकाऱ्यांना निवेदन
घोटी : इगतपुरी तालुक्यातील वाकी खापरी, कोरपगाव धरणातून सोडलेल्या पाण्याचा विसर्ग त्वरित बंद करण्यासाठी परिसरातील संतप्त शेकडो शेतकऱ्यांनी ज्येष्ठ शेतकरी नेते देवराम मराडे यांच्या नेतृत्वाखाली थेट धरणावर जाऊन ठिय्या आंदोलन करून पाण्याचा विसर्ग बंद करून वाकीखापरी प्रकल्प उपअभियंता हरिभाऊ गिते यांना निवेदन दिले. पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी ठेवावे, अशी मागणी वेळोवेळी करूनही संबंधित ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे गेल्या एक ते सव्वा महिन्यापासून लाखो लिटर पाण्याचा विसर्ग होत होता. अखेर शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे पाण्याचा विसर्ग बंद झाला आहे.
वाकी खापरी, कोरपगाव धरणाचे पाणी परिसरातील वाकी, कुर्णोली, कोरपगाव, भावली, वाळविहीर, पिंपळगाव भटाटा, आडवण, घोटीवाडी, खंबाळे, टाके घोटी, धानोर्ली या गावांना पिण्यासाठी व शेतीसाठी ठेवण्यात यावे, अशी मागणी होती. मात्र गेल्या एक ते सव्वा महिन्यापासून लाखो लिटर पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने वरील गावातील अनेक शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रॉनिक मोटर व आॅइल इंजिन पाण्यात बुडून गेले. काही शेतकऱ्यांचे पिकामध्ये पाणी घुसलेले आहे. यामुळे मोठे नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यामुळे अनेकांचे नुकसान झालेले आहे.
परिसरातील वाकी, कुर्णोली, कोरपगाव, भावली, वाळविहीर, पिंपळगाव भटाटा, आडवण, घोटीवाडी, खंबाळे, टाकेघोटी, धाणोर्ली या गावांना यापुढे टंचाईच्या काळात दुष्काळाला सामोरे जावे लागेल. तसेच पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या शेतीचा प्रश्न गंभीर होईल यासाठीच पाण्याचा विसर्ग बंद करीत असल्याचे शेतकरी नेते देवराम मराडे यांनी निवेदनात म्हटले आहे.
या आंदोलनप्रसंगी शेतकरी नेते देवराम मराडे, बाळासाहेब धुमाळ, हनुमान काळे, गोपाळ शेलार, भरत चव्हाण, पांडुरंग शेलार, भीमराव डोळस, नवनाथ कोकणे, प्रकाश डोळस, कारभारी गायकवाड, त्र्यंबक कोकणे, अशोक सराई, काशीनाथ कोकणे, आदि उपस्थित होते. (वार्ताहर)