‘समृद्धी’ला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
By admin | Published: April 8, 2017 12:14 AM2017-04-08T00:14:06+5:302017-04-08T00:14:15+5:30
दोन दिवस समृद्धी महामार्गाला विरोध केल्यानंतरही मोजणी थांबत नसल्याचे पाहून शिवडे येथील शेतकरी आक्रमक झाल्याचे दिसून आले.
सिन्नर : प्रस्तावित नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या मोजणीस सिन्नर तालुक्यात प्रारंभ झाला आहे. दोन दिवस समृद्धी महामार्गाला विरोध केल्यानंतरही मोजणी थांबत नसल्याचे पाहून सिन्नर तालुक्यातील शिवडे येथील शेतकरी आज आक्रमक झाल्याचे दिसून आले. महामार्गाच्या मोजणीसाठी अधिकारी शिवडे शिवारात येऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी रस्त्यावर टायर पेटवून अधिकाऱ्यांचा रस्ता अडविण्याचा प्रयत्न केला. तथापि भूसंपादन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे, प्रांताधिकारी महेश पाटील, तहसीलदार मनोजकुमार खैरनार यांच्यासह मोजणी अधिकारी पोलिसांचा मोठा फौजफाटा घेऊन शिवडे शिवारात दाखल झाले. अग्निशामक दल व रुग्णवाहिकेसह ताफा दाखल झाल्यानंतर घटनास्थळी मोठा तणाव निर्माण झाला. शेतकरी व महिलांनी मोजणी न करू देण्याची भूमिका घेतल्याने पोलीस बळाचा वापर करण्यात आला. यावेळी मोठा गोंधळ उडाला. टायरची जाळपोळ व किरकोळ दगडफेक यामुळे घटनास्थळी मोठा तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलीस वाहनात बसविले. यानंतरही महिलांचा विरोध तीव्रच होत गेला. या झटापटीत अंगावरचे कपडे फाटलेल्या शेतकऱ्याने मोजणी काही काळ रोखून धरली. पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूला मोजणी अधिकाऱ्यांनी मोजणी प्रक्रिया सुरू केली. पोलिसी बळाचा वापर करत दडपशाहीने मोजणी केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.