मार्केट बंदमुळे शेतकऱ्याने फेकला भोपळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:14 AM2021-05-16T04:14:16+5:302021-05-16T04:14:16+5:30
नाशिक शहरातील आडगाव, नांदूर मानूर, गिरणारे, मुंगसरा, दरी, मातोरी परिसरात अनेक शेतकरी बाराही महिने भाजीपाला शेती करतात. शहरापासून जवळ ...
नाशिक शहरातील आडगाव, नांदूर मानूर, गिरणारे, मुंगसरा, दरी, मातोरी परिसरात अनेक शेतकरी बाराही महिने भाजीपाला शेती करतात. शहरापासून जवळ असल्याने त्यांच्या शेतीमालाला उठाव व बाजारभावही चांगला मिळतो. सध्याही अनेक शेतकऱ्यांच्या शेतात भाजीपाल्याचे पीक उभे आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे पिके नष्ट होऊन शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले होते. यातून ते कसेबसे सावरत नाही तोच, कोरोनामुळे गेल्या चार दिवसांपासून बाजारसमिती बंद असल्यामुळे शेतकरी दुहेरी अडचणीत सापडले आहेत.
सध्या काकडी, दोडका, गिलका, भोपळा शेतमालाचा हंगाम असल्याने शेतात फळभाज्या तयार झालेल्या आहेत. परंतु मोठ्या प्रमाणावर आलेला हा माल दोन, चार किलो विक्री करणे शेतकऱ्याला शक्य नाही. शिवाय दिवसभर शहरात विक्रीसाठी बसून राहणे देखील परवडणारे नाही. अशातच बाजारसमितीत भाजीपाल्याचे लिलाव बंद असल्याने तेथेही विक्री करता येत नाही. तयार फळभाज्यांचा वेळेत खुडा झाला नाही तर फळभाज्यांचा आकार वाढून त्या खराब होतात. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना फळभाज्या शेतात खुडून टाकाव्या लागत आहेत. तर काही शेतकरी आपल्या जनावरांना खाण्यासाठी फळभाज्या टाकत आहेत. सध्या आडगाव, नांदूर शिवारात असे चित्र स्पष्ट दिसून येत आहे.
इन्फो===
शेतमाल खराब होण्याच्या प्रमाणात वाढ
कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजारसमिती बंद करण्यात आल्या आहेत. आम्ही भोपळा पीक घेतले होते. शेतातील तयार भोपळा वेळेत खुडा न केल्याने भोपळा शेतात फेकून द्यावा लागतो किंवा जनावरांना पिकात सोडून द्यावे लागत असल्याने आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
-संदीप लभडे, शेतकरी
(फोटो १५ भोपळा)