शेतकरी आत्महत्त्या बचाव अभियान राबविणार

By admin | Published: September 26, 2015 12:04 AM2015-09-26T00:04:47+5:302015-09-26T00:06:13+5:30

राजू शेट्टी : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा संकल्प

Farmers will conduct suicide prevention campaigns | शेतकरी आत्महत्त्या बचाव अभियान राबविणार

शेतकरी आत्महत्त्या बचाव अभियान राबविणार

Next

नाशिक : अवकाळी पाऊस, गारपीट व दुष्काळ अशा तिहेरी संकटात राज्यातील शेतकरी सापडला असून, कर्जबाजारी वाढल्याने शेतकरी आत्महत्त्यांचे प्रमाण वाढले आहे, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दि. २३ आॅक्टोबरपासून शेतकरी आत्महत्त्या बचाव अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिली.
सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त नाशिक येथे रामकुंडावर गोदापूजन केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, निसर्गाचा समतोल ढासळल्याने कुठे कोरडा दुष्काळ, तर कुठे अतिवृष्टी-गारपिटीसारखे संकट येत आहे. याला समाजातील उच्चभ्रू लोकांचा चंगळवाद जबाबदार असून, बेसुमार जंगलतोड करून सिमेंटचे जंगल उभे राहत आहे, तर दुसरीकडे जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी आत्महत्त्या करत आहे. त्याला मदत करण्याची जबाबदारी केवळ शासनाची नसून समाजाचीदेखील आहे. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दि. २३ आॅक्टोबरपासून शेतकरी आत्महत्त्या बचाव तथा आत्महत्त्येपासून शेतकऱ्यांना परावृत्त करण्यासाठी आत्महत्त्या करताना मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणारे शेतकरी दत्ता लांडगे यांच्या नावाने अभियान सुरू करणार आहोत. शेतकऱ्यांनी आत्महत्त्या करू नये यासाठी प्रयत्न करणार असून, संघटनेतर्फे सर्वेक्षणदेखील सुरू आहे, तसेच शेतकऱ्याला खासगी कर्जफेडीसाठी मदत करावी. सरकारने त्यासाठी दहा वर्षांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावे, असेही शेट्टी यांनी सांगितले.
दरम्यान, रामकुंडावर शेट्टी यांनी गोदामातेचे पूजन करून गंगागोदावरी मंदिरात दुष्काळ निवारणार्थ साकडे घातले. (प्रतिनिधी)

Web Title: Farmers will conduct suicide prevention campaigns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.