शेतकऱ्यांना मिळणार बांधावर खते-बियाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:14 AM2021-04-24T04:14:26+5:302021-04-24T04:14:26+5:30
पेठ : मागील वर्षभरापासून कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांवर विपरित परिणाम झाला असून, यातून कृषी क्षेत्रही सुटलेले नाही. कोरोनाची भीती ...
पेठ : मागील वर्षभरापासून कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांवर विपरित परिणाम झाला असून, यातून कृषी क्षेत्रही सुटलेले नाही. कोरोनाची भीती व घातलेल्या निर्बंधांमुळे खरीप हंगामावरही परिणाम होण्याची शक्यता गृहित धरून पेठ तालुक्यातील शेतकऱ्यांना थेट बांधावर खते व बियाणे पुरवठा करण्याबाबत तालुका कृषी कार्यालयाकडून नियोजन करण्यात येत आहे.
पेठ तालुक्यात भात व नागली ही दोन प्रमुख पिके घेतली जात असून, साधारण २६ हजार हेक्टरवर संभाव्य खरीप क्षेत्र गृहित धरण्यात आले आहे. यासाठी राब भाजणीपासून खरीप पेरणीपूर्व मशागत सुरू करण्यात आली आहे. मे अखेरीस पावसापूर्वी शेतातील एका कोपऱ्यात जमीन भाजून भुसभुशीत करण्यात येते. पावसाचा अंदाज घेऊन भात, नागली व वरईचे बियाणे टाकले जाते. यासाठी शेतकऱ्यांना बियाणे व खते खरेदी करण्यासाठी बाजार गाठावा लागत असल्याने यावर्षी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी व खरेदीसाठी बाजारात गर्दी होणार नाही, याची दक्षता घेऊन शेतकरी गटांच्या माध्यमातून एकत्रित मागणी करुन कंपनीमार्फत थेट बांधावर खते व बियाणे पोहोच करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
पेठ तालुक्यात कृषी विभागाने खरीप पिकवारी आराखडा तयार केला असून, जवळपास १००पेक्षा जास्त शेतकरी गट स्थापन करण्यात आले आहेत. कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी भात, नागली, वरई आदी बियाणे व युरियासह बी. ए. पी., एमओपी, भात पिकासाठी आवश्यक असलेले युरिया, ब्रिकेट गोळी खताची एकत्रित मागणी कृषी विभागाकडे नोंदवल्यास कंपनीमार्फत थेट बांधावर पुरवठा करण्यात येईल. शेतकऱ्यांनी एकत्रित मागणी करावी, असे आवाहन तालुका कृषी कार्यालयाने केले आहे.
कोट....
पेठ तालुक्यात मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही शेतकऱ्यांना बांधावर खते व बियाणे पोहोच करण्यात येणार असून, कोरोना काळात केवळ खरेदीसाठी गर्दी न करता एकत्रित मागणी नोंदवावी. पेठ तालुक्यात अंदाजे युरिया २१०० टन, बीएपी ६०० टन तर एमओपी १०० टन मागणी असते.
- अरविंद पगारे, तालुका कृषी अधिकारी, पेठ