शेतकऱ्यांना घरबसल्या मिळणार माल विक्रीची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:16 AM2021-07-07T04:16:58+5:302021-07-07T04:16:58+5:30
चांदवड : सन २०२५ मध्ये चांदवड बाजार समितीमध्ये सर्व कामकाज ऑनलाइन व संगणकीकृत झालेले असेल. तसेच बाजार समितीत शेतकरी, ...
चांदवड : सन २०२५ मध्ये चांदवड बाजार समितीमध्ये सर्व कामकाज ऑनलाइन व संगणकीकृत झालेले असेल. तसेच बाजार समितीत शेतकरी, व्यापारी व सर्व ग्राहकांकरिता पेट्रोलपंप असेल. बाजार समितीत शेतमाल विक्रीस आल्यापासून ते पेमेंट घेऊन बाहेर जाईपर्यंत शेतकऱ्यांच्या शेतमाल विक्रीची व्यवस्था अत्याधुनिक पद्धतीने होणार आहे. त्याचप्रमाणे त्यांना बाजार समितीत किती शेतीमाल विक्री केला आहे, याची माहिती घरबसल्या मिळू शकेल, असा विश्वास सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, उपसभापती नितीन आहेर व संचालक मंडळाने व्यक्त केला आहे.
चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीची दि. १ एप्रिल १९८२ रोजी स्थापना झाली. समितीची चांदवड येथे स्वमालकीची ११.१८ हेक्टर जमीन आहे. चांदवड हे समितीचे मुख्य बाजार आवार असून वडनेरभैरव, वडाळीभोई व रायपूर ही उपबाजार आवार आहेत. उत्तरोत्तर बाजार समितीची प्रगती होत असल्याची माहिती बाजार समिती शेतकरी, व्यापारी, मापारी, हमाल व सर्व बाजारघटकांना पुरेपूर सुविधा मिळवून देण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याचप्रमाणे स्पर्धेच्या युगात चांदवड बाजार समिती कोणत्याही क्षेत्रात मागे राहिलेली नाही. भविष्यात बाजार समितीचे संपूर्ण आवाराचे कॉंक्रिटीकरण झालेले असेल. बाजार समितीत कृषिग्रंथालय, माती-पाणी परीक्षण प्रयोगशाळा, मोफत प्रशिक्षण केंद्र व इतर आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध होतील. बाजार समितीत शेतकरी बांधवांना मोफत जेवणाची सोय केली जाईल. बाजार समितीचे उत्पन्न चांगले राहिल्यास तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातील.
भविष्यात बाजार समितीमधील ई-नामबाबतची कार्यप्रणाली
केंद्र शासनाच्या ई-नाम कार्यप्रणालीअंतर्गत बाजार समितीस्तरावरील लिलाव प्रक्रियेचे ( शेतमालाच्या आवकेपासून ते शेतमाल बाहेर जाईपर्यंत) संगणकीकरण करण्यात येणार आहे.
------------------------
शेतकरी, व्यापारी आडते यांची नोंदणी
बाजार समितीमध्ये आलेल्या शेतमालाची गेटवर ई-नाम संगणक प्रणालीद्वारे नोंद करणे, उपकरणांच्या सहाय्याने शेतमालाची गुणवत्ता तपासणी करणे व या माहितीची नोंद संगणक प्रणालीमध्ये भरणे, शेतमालाची लॉट व्यवस्थापन करून बीड क्रिएशन करणे, ई-नाम पोर्टल अथवा मोबाइल अपद्वारे ई-लिलाव ( ई-ऑक्शन ) करणे, संगणक प्रणालीद्वारे शेतकऱ्यास द्यावयाची रक्कम, बाजार समितीस द्यावयाची बाजार फी, तसेच सेल बिल तयार करणे, ई-पेमेंट सुविधेद्वारे शेतकरी वर्गाच्या बॅंक खात्यामध्ये विकलेल्या शेतमालाची रक्कम जमा करणे, ई- पेमेंटसाठी डेबिट कार्ड, क्रेेडिट कार्ड, नेट बॅंकिग, आरटीजीएस, एनएफटी, व चलन हे पर्याय उपलब्ध असणार आहेत.
---------------------
ई-ऑक्शन लिलावामुळे होणारे फायदे
प्रचलित लिलाव प्रक्रियेमध्ये पारदर्शकता, सुसूत्रता राष्ट्रीय स्तरावरील ई-बाजारामुळे शेतमालाच्या विक्रीबाबत स्पर्धा निर्माण होऊन शेतकऱ्यास रास्त बाजारभाव मिळण्यास मदत, ई-पेमेंट सुविधेमुळे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे. शेतमालाची शास्त्रोक्त पध्दतीने गुणवत्ता तपासणी, व्यापारी, आडते व शेतकरी यांमध्ये उचित समन्वय ठेवणे सुलभ होणार आहे. सर्व व्यवहार नोंदणीकृत झाल्याने बाजार समितीच्या उत्पन्नवाढीस मदत होणार आहे. ई-नाम कार्यपद्धती एमआयडी डिस्प्लेद्वारे आवारात ठिकठिकाणी लावण्यात येईल. त्यावर शेतकरी वर्गास आपला शेतीमाल किती रकमेला विक्री झाला याची माहिती मिळेल.
---------------------
रायपूर उपबाजार आवार
बाजार समितीचे उपबाजार आवार रायपूर येथे कांदा, टोमॅटो शेतीमालाचे लिलाव सुरू होऊन त्या ठिकाणी मूलभूत सोयीसुविधा केल्या जातील. रायपूर या तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी कांदा हब यासारखा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच टोमॅटो विक्रीची भव्य व्यवस्था करण्यात येणार आहे. भविष्यात या उपबाजार आवाराचा मोठ्या प्रमाणात विकास झालेला असेल.
-------------------
सौर ऊर्जा प्रकल्पासून वीजविक्री
वडाळीभोई येथे कांदा, भुसार या शेतमालाचे लिलाव सुरू होतील. तालुक्यातील पश्चिम भागातील शेतकरी बांधवांना जवळची बाजारपेठ उपलब्ध होईल. त्याचप्रमाणो बाजार समितीच्या स्वनिधीतून किंवा शासन अनुदानातून गुदामाचे बांधकाम करण्यात येईल.
वडनेरभैरव उपबाजार आवारात द्राक्षमणी, द्राक्षे, भाजीपाला लिलाव सुरू राहतील. या बाजार समितीचे आवारावर सौर ऊर्जा प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. त्यामुळे बाजार समितीस वीजबिलापोटी येणारा वार्षिक खर्च अंदाजित २० ते २५ लाखांची बचत होणार आहे. त्याचप्रमाणे सौर ऊर्जा प्रकल्पातून बाजार समिती विद्युत विक्री करणार आहे.