डाळिंबबागा करपू लागल्याने शेतकरी चिंतित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 01:01 AM2019-05-25T01:01:22+5:302019-05-25T01:01:43+5:30
निफाड तालुक्यातील बळीराजा दुष्काळामुळे दिवसेंदिवस अडचणीत सापडत आहे. रखरखत्या उन्हामुळे परिसरातील विहिरी, बोअरवेलने तळ गाठला आहे. पाण्याअभावी परिसरातील डाळिंबबागा करपू लागल्या असून, शेतकरी चिंतित आहे.
खेडलेझुंगे : निफाड तालुक्यातील बळीराजा दुष्काळामुळे दिवसेंदिवस अडचणीत सापडत आहे. रखरखत्या उन्हामुळे परिसरातील विहिरी, बोअरवेलने तळ गाठला आहे. पाण्याअभावी परिसरातील डाळिंबबागा करपू लागल्या असून, शेतकरी चिंतित आहे.
पाऊस वेळेत दाखल झाला नाही तर पाण्याच्या कमतरतेमुळे डाळिंबबागावर कुºहाड चालवण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर येणार आहे. पाण्याअभावी लाखो रुपयांचा खर्च आणि मेहनतीवर पाणी फेरले जाते की काय, या विवंचनेने परिसरातील डाळिंब उत्पादक हवालदिल झाले आहेत.
गेल्या वर्षी शेवटच्या टप्प्यातही पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही महिन्यांपासून तालुक्यात दुष्काळाच्या झळा अधिक तीव्र होताना दिसत आहे.
दिवसेंदिवस उन्हाची दाहकता वाढत चालल्याने डाळिंबबागेतील झाडे करपू लागले असून, शेतकरी चिंतित आहे. परिसरातील भूजल पातळीत घट झाल्याने विहिरी, बोअरवेल यांच्या पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाली आहे.
पाणीच नसल्याने बागा जगवायच्या कशा, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे.